दरवर्षी आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी आळंदीत दाखल होत असतात. याच पार्श्वभूमीवर आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा उत्साहात पार पडत आहे. दरम्यान, पालखी सोहळ्याला गालबोट लावणारी घटना घडली आहे. आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींचा प्रस्थान सोहळा सुरू असताना पोलिसांनी काही वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.
खरं तर, पालखी प्रस्थानावेळी मुख्य मंदिरात गर्दी आणि चेंगराचेंगरी टाळण्यासाठी प्रत्येक दिंडीतील ७५ वारकऱ्यांनाच आत घेण्याचं देवस्थाने ठरवलं आहे. तशी विनंती दिंडी मालकांना, फडकऱ्यांना आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगेश देसाई यांनी केली आहे. असं असताना काही वारकरी मंदिरात शिरण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी मंदिर परिसरात उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला आहे.
गेल्यावर्षी प्रस्थानावेळी मंदिरात १७ हजार वारकरी दाखल झाले होते. त्यामुळे यावर्षी दिंडीतील वारकऱ्यांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आली. पालखी सोहळ्याच्या प्रस्थान सोहळ्याच्या वेळी दिंडीतील प्रत्येक दिंडीतील केवळ ७५ वारकऱ्यांनाच आतमध्ये घेऊन जाण्याचं आवाहन आळंदी देवस्थानाकडून करण्यात आलं आहे. त्यामुळे मुख्य मंदिराबाहेर शेकडो वारकरी जमले आहेत. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात केला आहे. यावेळी काही वारकऱ्यांनी मुख्य मंदिरात शिरण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.