पिंपरी: आळंदी येथे मंदिरात जाण्यावरून वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. वारकऱ्यांवर लाठीमार करणाऱ्या सरकारचा निषेध असो.! याप्रकरणी दोषी व्यक्तींची चौकशी करुन त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी सुळे यांनी केली.

दरवर्षी आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी आळंदीत दाखल होत असतात. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखीचे रविवारी पंढरपूरकडे प्रस्थान झाले. वारकरी मंदिर प्रवेश करण्यासाठी आग्रही होते. यामध्ये पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये आधी शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर वारकरी पोलीस बंदोबस्तातील कर्मचाऱ्यांना आणि बॅरिकेट्सना लोटून देत मंदिर प्रवेशासाठी पुढे सरकले. पोलिसांनी त्यांना अडवले असता त्यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला. पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीमार केल्याने पालखी सोहळ्याला गालबोट लागले.

हेही वाचा >>>पुणे: पालखी सोहळ्यानिमित्त शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीस बंद; पोलिसांकडून ‘लाइव्ह लोकेशन’ सुविधा

यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वारकऱ्यांवर लाठीमार करणाऱ्या सरकारचा निषेध असो.!जे आजवर कधीही घडले नाही ते यावर्षी घडले. वारीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. या पूर्वी कधीही वारकऱ्यांवर बळाचा वापर केल्याची घटना घडली नव्हती. आपल्या साध्या आणि सोप्या शिकवणूकीतून वारकऱ्यांनी देशाला वेळोवेळी दिशा दाखविली आहे. माऊलींच्या दिंडी सोहळ्याला प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळे गालबोट लागले. दिंडी सोहळ्यासाठी आलेल्या वारकऱ्यांवर झालेला लाठीहल्ला हा अतिशय संतापजनक प्रकार आहे. या प्रकरणी दोषी व्यक्तींची चौकशी करुन त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची गरज आहे, असे सुळे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Story img Loader