अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे भारत भेटीदरम्यान देशभरातील उद्योजकांशीही संवाद साधणार असून त्यामध्ये दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे (डिक्की) अध्यक्ष मिलिंद कांबळे हेही सहभागी होणार आहेत.
कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इन्डस्ट्री (सीआयआय) आणि केंद्रीय वाणिज्य आणि औद्योगिक विकास विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्योजकांची भेट घेणार आहेत. या वेळी ओबामा उद्योजकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमासाठी डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. देशभरातील सर्व प्रमुख उद्योग समूह आणि चेंबर्सचे सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दिल्लीला सोमवारी (२६ जानेवारी) दुपारी हा कार्यक्रम होणार आहे.
याबाबत कांबळे यांनी सांगितले, ‘‘डिक्कीला देशपातळीवर मान्यता मिळालेलीच आहे. मात्र, या कार्यक्रमात सहभागी व्हायला मिळणे ही मोठी संधी आहे. डिक्कीच्या स्थापनेमागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक विचार हा प्रेरणास्रोत आहे, त्याचप्रमाणे उद्योगक्षेत्रातील सामाजिक विषमता मिटवण्यात अमेरिकेचाही मोठा वाटा आहे. यावेळी संधी मिळाल्यास भारत आणि अमेरिकेतील औद्योगिक संबंधांबरोबरच अमेरिकेतील उद्योग क्षेत्रात घडलेल्या सामाजिक क्रांती आणि त्याचा भारताशी असलेला संबंध याबाबत बोलायला आवडेल.’’

Story img Loader