अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आणि इंदापूर पोलिसांनी एका दूध संकलन केद्रावर छापा टाकून ८८० लिटर भेसळयुक्त दुधासह ३२ हजार ७०० रुपयांचा माल जप्त केला. इंदापूर तालुक्यात लाखेवाडी येथे हा छापा टाकण्यात आला. केद्राचा चालक हनुमंत बबन सानप याला अटक करण्यात आली आहे.
इंदापूर पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे लाखेवाडी येथे वालचंदनगर बावडा रस्त्यावरील मे. शरद सहकारी दूध उत्पादन संस्था या नावाने सानप हा दूधसंकलनाचा व्यवसाय करीत असल्याचे समजले. तिथे दुधामध्ये खाद्य तेल व दुधाची पावडर मिसळून त्यांची विक्री केली जात होती. या माहितीवरून अन्न सुरक्षा अधिकारी पराग नलावडे, विजयकुमार उनवणे यांच्या पथकाने इंदापूर पोलिसांसह तिथे छापा घातला. त्या वेली तिथे भेसळ केली जत असल्याचे दिसून आले.
या छाप्यात २५ भेसळयुक्त जेमिनी तेल दूध, ५० किलो ग्लुकोज पावडरचे मिश्रण, जेमिनी तेलाच्या सीलबंद ४० पिशव्या असा माल पोलिसांनी जप्त केला आहे. हे मिश्रण माणसासाठी खाण्यास योग्य नसून त्यांचे सेवन केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.
अलिकडील काळात मोठय़ा संख्येने शेतकऱ्यांची सुशिक्षित बेरोजगार मुले दुग्ध व्यवसायात उतरली आहेत. इंदापूर तालुक्यात या व्यवसायात दररोज कोटय़वधी रुपयांची उलाढाल होते. गेल्या काही वर्षांत बारामती तालुक्यात भेसळयुक्त दूध तयार करण्याचे मोठी साधनसामग्री व रासायनिक घटक असलेली पावडर मोठया प्रमाणामध्ये सापडली होती. त्यानंतर आता ही कारवाई झाली आहे.
इंदापूरजवळ दुधात भेसळ करणाऱ्या केंद्रावर छापा
मे. शरद सहकारी दूध उत्पादन संस्था या नावाने सानप हा दूधसंकलनाचा व्यवसाय करीत असल्याचे समजले. तिथे दुधामध्ये खाद्य तेल व दुधाची पावडर मिसळून त्यांची विक्री केली जात होती.
First published on: 24-04-2014 at 02:55 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Milk adulteration crime arrest indapur