भारतातील दूध पावडरला आंतरराष्ट्रीय बाजारात असलेल्या मोठय़ा मागणीच्या पाश्र्वभूमीवर राज्यामध्ये २१ डिसेंबरपासून दुधाच्या विक्री दरामध्ये प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या बैठकीत घेण्यात आला.
दूध महासंघाच्या अध्यक्षा वैशाली नागवडे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सहकारी व खासगी दूध व्यावसायिकांची बुधवारी बैठक झाली. त्यात दूध दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध पावडरला मोठय़ा प्रमाणावर मागणी आहे. ही मागणी पुरविण्यासाठी दूध पावडर उत्पादक कंपन्या व प्रकल्पांकडून चढय़ा दराने दुधाची खरेदी केली जाते. त्यामुळे पुडय़ांमधून दुधाची विक्री करणाऱ्या दूध प्रकल्पांना पुरेसे दूध उपलब्ध होत नाही. या पाश्र्वभूमीवर दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार म्हशीच्या दुधाचा दर ४४ वरून ४६ रुपये प्रतिलिटर, तर गायीच्या दुधाचा दर ३५ वरून ३७ रुपये प्रतिलिटर होणार आहे. हा दर कात्रज दुधाचा असेल, तर इतर कंपन्यांचा विक्री दर वेगवेगळा असल्याने त्यानुसार त्यात दोन रुपयांची वाढ केली जाईल.
नवा दर २१ डिसेंबरपासून लागू होणार आहे. मात्र, कात्रजच्या संचालक मंडळाची बैठक २४ डिसेंबरला होणार आहे. मंडळाच्या मान्यतेनंतरच दूध दरात वाढ केली जाईल. त्याचप्रमाणे खरेदी दरातही वाढ करण्याचे संकेत बैठकीत देण्यात आले. भविष्यात दूध आयात करण्याची नामुष्की ओढवू नये, यासाठी दुग्धव्यवसायाकरिता दीर्घ मुदतीचे धोरण आखण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे खरेदी-विक्रीच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी मिल्क पाऊच मार्केटिंग बोर्डाची स्थापना करावी, अशी मागणीही बैठकीत करण्यात आली.

Story img Loader