लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : दिवे घाटात दूध वाहतूक करणाऱ्या टँकरने पीएमपी बसला धडक दिली. अपघातात पीएमपी बसमधील वाहकासह आठ प्रवासी जखमी झाले. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पीएमपी बसमधील वाहक जयवंत गायकवाड यांच्यासह प्रवासी शुभांगी शिंदे (वय १८), संस्कृती कांबळे (वय १७), धनश्री सूर्यवंशी (वय २३), संध्याराणी सोनकांबळे (वय १७), पायल होळ (१८), प्रज्ञेश कोरेगावकर (वय २२), स्वप्नील भुजबळ (वय ३०) जखमी झाले. याप्रकरणी दूध वाहतूक करणारा टँकरचालक रणजीत श्रीकांत वाळके (वय ३२, रा. हाळदी, जि. कोल्हापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत नवनाथ वसंतराव सूर्यवंशी (वय २७, रा. मंतरवाडी, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आणखी वाचा-कबाब वेळेत न दिल्याने वाद; हॉटेल मालकाकडून ग्राहकाला मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवे घाटातून दोन दिवसांपूर्वी पीएमपी बस सासवडकडे निघाली होती. त्यावेळी सासवडकडून पुण्याकडे भरधाव वेगाने दूध वाहतूक करणारा टँकर निघाला होता. समोरुन येणाऱ्या पीएमपी बसला टँकरने धडक दिली. टँकर घासत गेल्याने बसमधील वाहकासह प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर टँकरमधील दूध सांडले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घाटातून जाणारे वाहनचालक आणि पोलिसांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे तपास करत आहेत.