लालकृष्ण अडवानी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना भाजपमध्ये किंमत उरली नाही. कारण केंद्रात नरेंद्र मोदी यांची हिटलरशाही आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंचवड येथे राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते असूनही नागपूरमध्येच गुन्हेगारी वाढली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याने सामान्य माणूस असुरक्षित झाला आहे, असे ते म्हणाले. औरंगाबादमध्ये ‘एमआयएम’च्या ‘वेगळ्या’ प्रचारामुळे भाजप-सेनेला पुन्हा कौल मिळाला, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
पवार म्हणाले, मोदींनी कायम मार्केटिंग केले. एका वर्षांच्या त्यांच्या कारभारावर कोणीच समाधानी नाही. जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. शेतकरीविरोधी कायदा करून जमीन काढून घेणारे हे सरकार कामगारविरोधी धोरणे राबवत आहेत. गुजरातच्या एका महिला खासदाराने ठुमके मारले. काही मिनिटात तिथे नोटांचा पाऊस पडला, हे ‘अच्छे दिन’ आहेत का, आठ-दहा मुले जन्माला घाला, असे आवाहन असो, की मोबाइलचे बिल भरता मग विजेचे बिल भरायला काय होते, अशी बेताल वक्तव्ये म्हणजे ‘अच्छे दिन’ आहे का. पावणेदोन कोटी जनतेला रेशन धान्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांकडे गृहखाते आहे. नागपूरला कैदी पळून जाण्याची घटना तिथे घडते. राज्यात महिलांवर अत्याचार सुरूच आहेत. कॉ. पानसरे यांच्या हत्येतील आरोपींचे धागेदोरे अद्याप सापडत नाही. मराठीचे राजकारण करणारे नेते स्वत:ची मुले इंग्रजी शाळेत टाकतात. औरंगाबादच्या निवडणुकीत ‘एमआयएम’मुळे प्रचाराचे मुद्दे बदलले. हिंदूू-मुस्लीम मतविभागणी झाल्याचा फायदा झाल्याने युतीला पुन्हा कौल मिळाला. नव्या मुंबईत गणेश नाईक व त्यांच्या कुटुंबीयाने जीवाचे रान केले आणि सत्ता राखली. तेथे राष्ट्रवादीचाच महापौर होईल.
 वर्षभरात मोदींचे १५ विदेश दौरे – भास्कर जाधव
‘अच्छे दिन’ येतील, असे आश्वासन भाजपने दिले. मात्र, केवळ नरेंद्र मोदींना ‘अच्छे दिन’ आलेत. वर्षभरात मोदींनी १५ विदेशवाऱ्या केल्या, अशी खिल्ली राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी उडवली. भाजपवाल्यांच्या खोटय़ा भाषणांना सगळेच फसले. पुण्यात भाजपचे काहीही नसताना आठ आमदार निवडून आले, त्यांनी आपल्याला नेस्तनाबूत केले, याचा खेद वाटला पाहिजे. संघटना बळकट असल्यास कधीही सत्ता घेता येते, त्या दृष्टीने विचार करा, असे आवाहन जाधव यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केले.

Story img Loader