पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेचा झंझावात सक्रिय असल्याने मुंबईसह किनारपट्टीवर थंड वारे वाहत आहेत. परिणामी, मुंबईसह आणि किनारपट्टीवर दिवसभर आकाश अंशतः ढगाळ राहिल्यामुळे किमान तापमानात घट होऊन मुंबईत गारवा जाणवत आहे. तसेच पुढील दोन दिवस गारवा जाणवण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>> कसब्यातील विजयाची वर्षपूर्ती आमदार रवींद्र धंगेकर यांनी कशी साजरी केला?
पुण्यातील हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमालयीन परिसरासह उत्तर भारतात पश्चिम विक्षोप म्हणजे उत्तरेकडून येणारा थंड हवेचा झंझावात सक्रिय आहे. हा थंड हवेचा प्रवाह अरबी समुद्रावरून वाटचाल करत मुंबईसह किनारपट्टीवर पोहोचला आहे. थंड वाऱ्याने आपल्या सोबत अरबी समुद्रातील बाष्प वाहून आणले आहे. त्यामुळे किनारपट्टीवर थंड वारे वाहत असून, हवेत बाष्पाचे प्रमाण वाढले आहे. रविवारी मुंबईत दिवसभर कमी-अधिक प्रमाणात थंड वारे वाहत होते. तसेच बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे आकाश अंशतः ढगाळ राहिले. त्यामुळे मुंबईसह किनारपट्टीवर किमान तापमानात घट झाली आहे. रविवारी डहाणूत २३.४, हर्णेत २३.२, कुलाब्यात २३.३ आणि सातांक्रुजमध्ये २४.४ आणि रत्नागिरीत २२.७ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. किमान तापमानात मागील दोन दिवसांपासून घट झाली आहे. पुढील दोन दिवस मुंबईत गारवा जाणवण्याचा अंदाज आहे. तसेच किनारपट्टी आज, सोमवारी तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडण्याचा अंदाजही आहे.
हेही वाचा >>> कल्याण ते तळोजा मेट्रो १२ कामाला अखेर सुरुवात, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज कामास आरंभ
दोन दिवस गारव्याचे… उत्तरेत सक्रिय असलेला थंड हवेच्या प्रवाह किनारपट्टीपर्यंत येत आहे. हवेत बाष्पाचे प्रमाण वाढल्यामुळे अंशतः ढगाळ हवामान झाले आहे. पुढील दोन दिवस मुंबईसह किनारपट्टीवर किमान तापमानात घट होऊन काहीसा गारवा जाणवू शकतो. मार्च महिन्यात तापमानात असे चढ-उतार दिसून येत असतात, अशी माहितीही पुणे येथील हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.