किमान तापमान अद्यापही १० अंशांखाली
पुणे : पुणे शहर आणि परिसरामध्ये रात्री थंडीचा मुक्काम कायम आहे. निरभ्र आकाशाची स्थिती आणि उत्तरेकडून येणारे थंड वाऱ्यांचे प्रवाह यामुळे शहरातील किमान तापमानाचा पारा अद्यापही १० अंश सेल्सिअसच्या खालीच आहे. येते दोन ते तीन दिवस आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता असल्याने तापमानात चढ- उतार होण्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे.
शहर आणि परिसरामध्ये डिसेंबर महिन्याच्या मध्यावर किमान तापमानात घट नोंदविली जाऊन गारव्यात वाढ झाली होती. डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ामध्ये रोजच नीचांकी तापमानाची नोंद होत गेली. उत्तरेकडील काही भागात बर्फवृष्टी सुरू झाली असतानाच शहरातील कोरडय़ा हवामानाने थंडीला पोषक स्थिती मिळवून दिली. परिणामी डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात पुण्यात ५.९ किमान तापमानाची नोंद झाली. मागील दहा वर्षांच्या तुलनेतील हे नीचांकी तापमान ठरले होते. शहराला खऱ्या अर्थाने हुडहुडी भरविणारी ही थंडी होती. अंगात उबदार कपडे घातल्याशिवाय संध्याकाळनंतर घराबाहेर पडणे शक्य नव्हते. नव्या वर्षांच्या स्वागतालाही चांगलाच गारठा होता. त्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात तापमानात काहीशी वाढ झाली असली, तरी थंडी कायम असल्याचे चित्र आहे.
डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ापासून आजपर्यंत सुमारे १५ दिवसांपासून शहरातील किमान तापमानाचा पारा १० अंशांखाली किंवा त्याच्या आसपास नोंदविला जात आहे. त्यामुळे थंडीचा मुक्काम कायम राहिला आहे. गुरुवारी शहरात ८.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीच्या तुलनेत १.८ अंशांनी कमी आहे. दुसरीकडे कमाल तापमानात वाढ होत आहे. तीनच दिवसांपूर्वी २६ ते २७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलेले कमाल तापमान गुरुवारी ३१ अंशांवर पोहोचले. ते सरासरीच्या तुलनेत २ अंशानी अधिक आहे. त्यामुळे दुपारी उन्हाचा काहीसा चटका जाणवू लागला आहे. संध्याकाळी सातनंतर मात्र गारवा जाणवण्यास सुरुवात होते. रात्री बाराच्या आसपास त्याची तीव्रता वाढते. पुढील काही दिवस आकाश अंशत: ढगाळ राहणार आहे. त्यामुळे थंडीमध्येही चढ- उतार होऊ शकतो. १३ किंवा १४ जानेवारीनंतर पुन्हा निरभ्र आकाश राहणार असल्याने थंडी कायम राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
इतर ठिकाणांची थंडीची स्थिती
उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह येत असल्याने राज्याच्या काही भागात गारठा वाढला आहे. प्रामुख्याने विदर्भामध्ये किमान तापामानात लक्षणीय घट होऊन थंडी वाढली आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यातही थंडीत चढ-उतार होण्याची शक्यता आहे. प्रमुख विभागांमध्ये नोंदविलेले किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) पुढीलप्रमाणे- मुंबई (कुलाबा) १८.५, सांताक्रुझ १४.६,रत्नागिरी १६.३, पुणे, ८.८, नगर ६.२, जळगाव ६.६, कोल्हापूर १४.७, महाबळेश्वर १४.०, मालेगाव ९.२, सातारा १०.३, सोलापूर १३.८,औरंगाबाद ८.७,उस्मानाबाद १३.०, परभणी ९.५, अकोला ८.२, अमरावती ११८, बुलडाणा १०.६, ब्रह्मपुरी ८.५,चंद्रपूर १०.४, गोंदिया ८.५, नागपूर ७.७, वाशिम, ११.०,वर्धा १०.९,यवतमाळ १०.४.
थंडीत चढ-उतार कशामुळे?
पुणे शहरामध्ये सध्या किमान तापमान सरासरीच्या आसपास आहे. कमाल तापमान मात्र सरासरीपेक्षा अधिक असल्याने दुपारी ऊन जाणवते आहे. अशा स्थितीबाबत हवामान अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री आकाश निरभ्र राहिल्यास दिवसभराची उष्णता वातावरणामध्ये निघून जाते. त्यामुळे रात्री थंडी जाणवते. त्याउलट रात्री आकाश ढगाळ किंवा अंशत: ढगाळ राहिल्यास दिवसभरातील उष्णता वातावरणातच राहते. परिणामी थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी होऊन थंडी कमी होते. पुढील -दोन ते तीन दिवस शहरात आकाश अंशत: ढगा़ळ राहणार आहे. त्यानंतर ते निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे थंडीत चढ- उतार होण्याची शक्यता आहे.