पिंपरी : ‘लाडकी बहीण योजनेच्या शासन निर्णयात कोणताही बदल केलेला नाही. निकष बदललेले नाहीत. ऑगस्टमध्ये छाननी केली असता ७५ हजार, तर सप्टेंबरमध्ये एक लाखापेक्षा अधिक अर्ज पात्र ठरू शकत नव्हते हे समोर आले. ते अर्ज बाद केले. तीनवेळा, चारचाकी वाहन असतानाही काही महिला लाभ घेत असल्याबाबत तक्रारी आल्या आहेत. त्यासंदर्भातील चौकशी केली जाईल’, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. ‘छाननीची प्रक्रिया नियमितपणे सुरू आहे. ही प्रक्रिया निवडणुकीनंतर सुरू केली नाही. विरोधक अपप्रचार करतात’, असा आरोपही त्यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

पिंपरी-चिंचवडमधील एका कार्यक्रमासाठी आलेल्या तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लाडकी बहीण याेजनेत अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न, चारचाकी नसावी, महिला राज्यातील रहिवासी असाव्यात, सरकारी नोकरदार नसाव्यात हे निकष पहिल्याच शासन निर्णयात होते. त्यात कोणताही बदल केला नाही. आधीचा कोणताही लाभ खात्यातून परत घेतला नाही. तसा कोणताही निर्णय झाला नाही. केवळ फेरतपासणीत पात्र ठरत नसलेल्या महिलांचा लाभ बंद करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली जात आहेत. छाननीची प्रक्रिया नियमितपणे सुरू आहे. निकष पूर्ण करत नसलेल्या एक लाखापेक्षा अधिक महिलांचे अर्ज छाननीत बाद झाले आहेत. पात्र, गरजू महिलांना लाभापासून वंचित ठेवले जाणार नाही, असे त्यानी स्पष्ट केले.

मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने होत असलेल्या आरोपांवर तटकरे म्हणाल्या, ‘वेगवेगळे आरोप करण्याची मालिका सुरू आहे. आरोप झाले म्हणजे सिद्ध झाले असे नाही. आरोप-प्रत्यारोप होत असतात. पूर्णपणे चौकशी करूनच योग्य तो निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील. आरोपाबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडे काही कागदपत्रे, पुरावे आहेत, हे माहिती नाही. कागदपत्रांची तपासणी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील.’

पालकमंत्रीपद सर्वस्व नाही

‘नाशिक, रायगडच्या पालकमंत्री पदाबाबतचा योग्य तो निर्णय महायुतीचे तिन्ही नेते घेतील. रायगडची अर्थसंकल्पापूर्वीची बैठक झाली आहे. कामकाज सुरू आहे. महायुती एक असून भविष्यातही एकत्र काम करणार आहे. काही मतमतांतरे असल्यास ते महायुतीचे नेते सोडवतील. काहीवेळा असे निर्णय घेण्यामध्ये थोडा विलंब होतो. वेळ लागत असला तरी जिल्ह्याचे विकासाच्या दृष्टीने नुकसान होऊ दिले जात नाही. पालकमंत्रीपदाबाबत महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल. जिल्ह्याला, राज्याला पुढे न्यायचे आहे. पालकमंत्रीपद हे काही सर्वस्व नाही,’ असेही तटकरे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minister aditi tatkare said about criteria for ladki bahin yojana ggy 03 zws