पिंपरी : ‘अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसलेला बांगलादेशी होता. सैफ व्यवस्थित चालत येत होता. त्यामुळे सैफवरील हल्ला संशयास्पद आहे. त्याने स्वत:च चाकू मारून घेतला की काय,’ अशी शंका राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आळंदीतील हिंदू महोत्सव कार्यक्रमात बुधवारी व्यक्त केली.
अयोध्या येथील राम मंदिर उभारणीच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित आळंदी आणि निगडी येथील कार्यक्रमांना राणे उपस्थित राहिले. आळंदीतील हिंदू महोत्सव कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. त्याचप्रमाणे खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, ‘सैफ अली खान, नवाब मलिक, शाहरूख खानचा मुलगा यांच्याबाबत काही झाले, तरच बारामतीच्या ताईला पुळका येतो. त्या तातडीने पुढे येतात. मात्र, सुशांतसिंगच्या आत्महत्येवर त्या गप्प असतात. हिंदू अभिनेत्यांवरील, कलाकारांवरील हल्ल्यानंतर त्या काही बोलत नाहीत. बांगलादेशी अगोदर नाक्यावर उभे राहत होते. आता घरात घुसायला लागले आहेत. भारताला इस्लाम राष्ट्र बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ‘जय श्रीराम’ म्हणणाऱ्यांच्या घरात घूसून मारण्याचे प्रकार घडले. हिंदू समाज म्हणून एकत्र राहून जशास तसे उत्तर देण्याची गरज आहे.’
‘प्रत्येक हिंदूच्या आयुष्यात अयोध्येत राम मंदिर पाहायला मिळाले, हा मोठा क्षण आहे. जे आपल्या हक्काचे आहे, ते घेणारच, हे या दिवसाचे महत्त्व आहे,’ असे ते म्हणाले. ‘हिंदू राष्ट्रात धर्मस्थळावर अतिक्रमण केले जाते. प्रमुख धर्मस्थळावर वक्फ बोर्डाने ताबेमारी सुरू केली आहे. भविष्यात आळंदीकडेही वाकड्या नजरेने पाहतील. त्यासाठी हिंदू समाजाने दक्ष राहिले पाहिजे. मंत्री झालो म्हणून काय झाले, मी अगोदर हिंदू आहे, हे विसरलो नाही. धर्माकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिले, तर मंत्रीपद बाजूला ठेवून त्याला जागेवर ठेवणार नाही.
सर्वधर्म समभाव ही नाटके केवळ हिंदू समाजासाठी आहेत. ईद, मोहरम, चर्चमधील कोणत्याही कार्यक्रमात हिंदूंनी अडथळे आणले नाहीत. पण, गणपती, हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर दगड मारण्याची हिंमत का होते? ‘सेक्युलर’ हा शब्द राज्यघटनेत नाही. काँग्रेसची नाटके आहेत. भारत देश हिंदू राष्ट्र आहे. येथे पहिले हिंदूंचे हित पाहिले जाईल. देशात, राज्यात हिंदूंचे सरकार आहे. गोरक्षकाला त्रास देणारा घरी सुखरूप जाणार नाही, याची काळजी पोलीस घेतील. कीर्तनकार सातत्याने हिंदुत्वावर बोलत असतात. त्यांच्या वाणीत समाज घडवण्याची मोठी ताकद असते. त्यामुळे कीर्तनकारांनी हिंदू धर्माचे प्रबोधन करावे,’ असेही राणे यांनी सांगितले.
‘मुख्यमंत्र्यांचे रक्त भगवे’
‘येणाऱ्या काळात राज्यात एक कत्तलखाना ठेवणार नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे रक्त लाल नसून, भगवे आहे. या सरकारमध्ये कॉलर टाइट करून जगायचे आहे. हिंदूंना त्रास झाल्यास अधिकारी पाठीशी उभे राहतील, याची ग्वाही देतो,’ असेही नितेश राणे म्हणाले. श्रीरामाचे मंदिर उभे राहिले, तेव्हा काही लोकांना हिरव्या मिरच्या लागल्या होत्या. काही हिरव्या सापांचे म्हणणे होते, की ‘जय श्रीराम’ म्हणू नका. त्यामुळे आपली ओळख दाखविणे काळाची गरज आहे. आपले सरकार नसताना राज्यात हिरवे गुलाल उधळून ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या जात होत्या. पण, त्याला हिंदूंनी विधानसभेला उत्तर दिले. भगवे सरकार राज्यात बसवले, असेही मंत्री राणे म्हणाले.