पुणे : ‘पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी स्वच्छ, पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासह पालखी मार्गावरील रस्ते, पालखीतळ दुरुस्तीसाठीचे प्रस्ताव दोन दिवसांत सादर करावेत,’ अशी सूचना राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांनी केली. रस्तेदुरुस्तीच्या अडचणींवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्याच्या कामांना मान्यता आणि निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

आषाढी वारीपूर्व तयारी संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवारी बैठक झाली. त्या वेळी गोरे यांनीही सूचना केली. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, अपर आयुक्त अरुण आनंदकर यांच्यासह अन्य अधिकारी या वेळी उपस्थित होते.

‘पालखी मुक्कामाच्या ठिकाणी, पालखी मार्ग आणि विसावा स्थानांवर स्वच्छता राखली जाईल, याची विशेष खबरदारी घ्यावी. स्वच्छतेसाठी पुरेशा प्रमाणात फिरती शौचालये आणि अधिक प्रमाणात स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. टँकरमधील पाण्याच्या शुद्धतेबाबत नियमित तपासणी करावी. पाण्याच्या स्रोतांचे शुद्धीकरणही होईल याकडे लक्ष द्यावे. वारीदरम्यान देण्यात आलेल्या कामांसाठी कंत्राटदारांकडून अटी आणि शर्तीचे पालन करून कामे होण्यासाठी त्यांच्यावर शासकीय यंत्रणेने अंकुश ठेवावा. ग्रामपंचायतींना आगाऊ निधी देण्याची व्यवस्था करण्यात येईल,’ असे गोरे यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी सादरीकरणाद्वारे करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. गोरे यांनी आषाढीवारीच्या अनुषंगाने सर्वच जिल्ह्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पुणे, सातारा, सोलापूर, नाशिक आणि जळगाव मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली.