पुणे : स्वारगेट एसटी स्थानकात सुरक्षेची जबाबदारी एसटी महामंडळाची आहे. खासगी सुरक्षा यंत्रणांनी ही जबाबदारी पूर्ण केलेली नाही, असे दिसत असल्याची भूमिका गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी मांडली. तसेच, पोलिसांनी ही घटना लपवली नसून आरोपी सतर्क होऊ नये म्हणून गुप्तता बाळगली गेल्याचा दावा त्यांनी केला.

या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा फरार असून त्याच्या शोधासाठी पथके तैनात करण्यात आली असताना कदम यांनी गुरुवारी स्वारगेट एसटी आगाराची पाहणी केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, की स्थानकात सुरक्षितता पुरवणे ही एसटी महामंडळाची जबाबदारी आहे. त्यासाठी खासगी सुरक्षा यंत्रणा नेमण्यात आली आहे. त्यांनी २४ तास सुरक्षिततेची काळजी घेणे अपेक्षित आहे. त्यांच्याकडून ती घेण्यात आली नाही. ही जबाबदारी आगार व्यवस्थापकाची आहे. केवळ पत्रव्यवहार करून आपली जबाबदारी झटकता येणार नाही. खासगी सुरक्षा रक्षक जागेवर येतात, की नाही, हेही पाहिले गेले पाहिजे. ही घटना घडली, त्या दिवशी स्वारगेट पोलिसांकडून रात्री बारा ते पहाटे सहा वाजेपर्यंत किती वेळा गस्त घालण्यात आली, हे सीसीटीव्ही चित्रीकरणात दिसत आहे. स्वारगेट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि त्यांचे पथक रात्री दीड वाजता एसटी स्टँडच्या आवारात आले होते. त्यानंतर पहाटे तीन वाजता पुन्हा एकदा पोलिसांचे पथक आवारात येऊन गेले. त्यामुळे पोलिसांकडून दुर्लक्ष झाले, ते सावध नव्हते, या आरोपात तथ्य नाही, असा दावा कदम यांनी केला.

‘आरोपी सापडल्यावर तथ्ये समजतील’

स्वारगेट एसटी स्थानकावर जी घटना घडली, त्यामध्ये कुठलाही संघर्ष झाला नाही. त्यामुळे कुणालाही ते कळले नाही. आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा आरोपी ताब्यात येईल, तेव्हा घटनेतील तथ्ये उघडकीस येतील, असे योगेश कदम यांचे म्हणणे आहे. ‘घटना सहा वाजता घडली, नऊला फिर्याद आली, त्यानंतर अर्ध्या तासात आरोपीची ओळख पटवून पाठलाग सुरू झाला,’ असेही त्यांनी नमूद केले.

पोलीस आणि परिवहन विभागात सुरक्षेच्या संदर्भात लवकरच चर्चा केली जाईल. एसटी प्रशासनाबद्दल आणि त्यांच्याकडून होणाऱ्या कार्यवाहीबद्दल परिवहनमंत्री प्रताप सरनाईक बोलतील. स्थानकातील संवेदनशील ठिकाणच्या गस्तीसाठी पोलीस मार्शल देता आले, तर त्यादृष्टीने चाचपणी करू.- योगेश कदम, गृह राज्यमंत्री

Story img Loader