पुणे : राज्यामध्ये साथरोग उद्रेक काळात जीवाणू व विषाणू चाचणी जलद गतीने करण्यासाठी पुण्यातील सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत रेण्वीय निदान प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवारी केली. आरोग्य विभागाच्या राज्य कुटुंब कल्याण भवन आणि प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रमात आरोग्यमंत्री आबिटकर बोलत होते. राज्यात साथरोगाचा उद्रेक झाल्यास जीवाणू आणि विषाणूंची तपासणी करण्यासाठी नमुने राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत (एनआयव्ही) पाठवावे लागतात. नुकत्यात पुण्यात झालेल्या गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) उद्रेकावेळी पुण्यातील सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत पाणी नमुने तपासण्यासाठी यंत्रणाच नसल्याची बाब समोर आली होती. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत जीवाणू आणि विषाणू चाचणीसाठी रेण्वीय निदान प्रयोगशाळा उभारण्याची घोषणा केली आहे. यामुळे भविष्यात तातडीने जीवाणू आणि विषाणू चाचणी करणे आरोग्य विभागाला शक्य होणार आहे.

सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने रुग्णालयांमध्ये स्वच्छता, आहार आणि रुग्णालयात वापरल्या जाणाऱ्या वस्त्रांची स्वच्छता हे अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत. त्यामुळे राज्यातील ८ परिमंडळातील ५९३ आरोग्य संस्थांमध्ये यांत्रिक वस्त्र धुलाई सेवा केंद्रे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. याचबरोबर राज्य बोगस दिव्यांग प्रमाणपत्राबाबत चौकशीच्या सूचना दिलेल्या आहेत. याबाबत कारवाई सुरू असून, याची सरकारने गंभीर दखल घेतली आहे, असे आबिटकर यांनी सांगितले.

दीनानाथ रुग्णालयावर कारवाई

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेबाबत राज्य सरकारने आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आणि न्याय विभाग या सर्वांच्या सूचना ऐकल्या आहेत. वैद्यकीय उपचारातील हलगर्जीपणाबाबत डॉक्टरांवर कारवाई झाली आहे. याचबरोबर रुग्णालयाला दंडही ठोठावण्यात आला आहे. भविष्यात राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये अशा पद्धतीने कुठल्याही रुग्णाला नाकारता येणार नाही, याचे धोरण आखण्यात आले आहे. पुण्यात घडलेली घटना दुर्दैवी असून, नवीन धोरणाचा फायदा राज्यातील नागरिकांना होईल, असे आबिटकर यांनी नमूद केले.