पुणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत विडंबनगीत सादर करणारा विनोदपटू कुणाल कामराला ताडीने अटक करा आणि टायरमध्ये घालून ‘प्रसाद’ द्या, असा अजब सल्ला राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी गुरुवारी पोलिसांना दिला. शिंदे यांनी सबुरीचा सल्ला दिल्याने आम्ही शांत आहोत. मात्र आमच्या कार्यकर्त्यांच्या संयमाचा अंत पाहू नये, असे ते म्हणाले.
कामरा जेथे लपला असेल तेथून कसे उचलून आणायचे हे आम्हाला माहीत आहे. मात्र मंत्री असल्याने काही मर्यादा पाळाव्या लागतात, असे सांगत देसाई यांनी पोलिसांना तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले. कामराने एका कार्यक्रमात ‘दिल तो पागल है’ या चित्रपटातील गाण्याचा आधार घेत विडंबन सादर केले होते. यामध्ये शिंदे यांचे नाव वापरण्यात आले नसले तरी ‘गद्दार’ असा शब्दप्रयोग करण्यात आला होता. हे गीत शिंदे यांना उद्देशून असल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी रविवारी रात्री खार परिसरातील स्टुडिओची मोडतोड केली होती. त्यानंतर कामरावर कारवाईची मागणी सत्ताधारी पक्षांकडून होत आहे.