पुणे प्रतिनिधी: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्यासाठी राज्यासह देशातील अनेक मोठे नेते मातोश्रीवर आल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे. परंतु आज उद्धव ठाकरे काका मला वाचवा म्हणत सिल्व्हर ओक वर लोटांगण घालत. शरद पवार यांची भेट घेण्यास गेल्याचे पाहून राज्यातील जनतेला खेद वाटत आहे. अशा शब्दात शिवसेनेचे नेते राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची एका न्यूज चॅनेलवर झालेल्या मुलाखतीमधील अनेक विधान सध्या चर्चेत आहेत. त्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओक वर जाऊन भेट घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या सोबत संजय राऊत हे देखील उपस्थित होते. या दोन्ही नेत्यांच्या अचानक भेटीमुळे आगामी कालावधीत काही राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याच दरम्यान शिवसेनेचे नेते मंत्री शंभूराज देसाई यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटी बाबत पुण्यात पत्रकार परिषद घेऊन खरपूस समाचार घेतला. तसेच यावेळी अनेक विषयावर त्यांनी भाष्य देखील केले.

आणखी वाचा- पुण्यात आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टेबाजी

यावेळी शंभूराज देसाई म्हणाले की, राज्यात युती सरकार होते. त्यावेळी सत्तेचा आणि युतीचा रिमोट हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हातात होता. ते देशातील जनतेने पाहिले होते आणि ते सर्वांना मान्य देखील होते. मात्र आता त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांनी आपला वारसा, अभिमान आणि मराठी बाणा गुंडाळून स्वतःचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादी काँग्रेसकडे दिला. हे आपण मागील अडीच वर्षाच्या काळात महाविकास आघाडीच्या माध्यमातुन पाहिले आहे. त्यामुळे पक्षाची काय अवस्था झाली. आज तर उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओक येथील निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी त्यांच्या सोबत संजय राऊत देखील होते.

आणखी वाचा- मुख्यमंत्र्यांचा फोन आणि चंद्रकांत पाटील यांची सारवासारव; बाबरी पतनातील शिवसेनेच्या सहभागाबद्दल स्पष्टोक्ती

या भेटीमधून रिमोट कोणाच्या हातामध्ये आहे. हे पुन्हा एकदा दाखवून दिले असून या सर्व घटनांना संजय राऊत हेच कारणीभूत असल्याचे सांगत संजय राऊत यांना त्यांनी टोला लगावला. तसेच ते पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांनी सावरकर बद्दल वक्तव्य केले. त्यावर उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडली नाही. जेपीसी बाबत संजय राऊत भूमिका मांडतात. पण याच मुद्द्यावर शरद पवार गरज नसल्याची सांगतात. त्यामुळे मागील काही दिवसातील विधान पाहिल्यावर महाविकास आघाडीमध्ये लवकरच दरी पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

भाजपचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विधानाबाबत ते म्हणाले की, बाबरी मशीद पाडण्यासाठी सर्व हिंदुत्ववादी एकत्र आले होते. त्यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून शिवसैनिकांचा मोठा सहभाग होता. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्याकडे अपुरी माहिती असून आम्ही त्यांच्या विधानाशी सहमत नसल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minister shambhuraj desais criticise sharad pawar and uddhav thackerays meeting svk 88 mrj