पिंपरी चिंचवड : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज तळेगाव एमआयडीसीमध्ये फॉक्सकॉन वेदांता ज्या जागेवर होणार होता त्या जागेची पाहणी केली. यावेळी उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांसह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात वाद आहे का? या प्रश्नावर देखील त्यांनी भाष्य केले.

हेही वाचा : चंद्रकांत पाटील करणार अजितदादांचा ‘हिशोब’ चुकता

उदय सामंत म्हणाले, आज मी काही धोरणात्मक निर्णय घेतोय. फॉक्सकॉन वेदांता ज्या जागेवर होणार होता, तेथील मी पाहणी ही केली. त्या ठिकाणची काही जागा ही इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये तर काही जागा अधिग्रहीत करणे अद्याप बाकी आहे. ती जागा अधिग्रहण करण्याचा निर्णय आज घेतला जाणार आहे. तसेच जी दोन हजार एकर जागा अधिग्रहीत केली जाणार आहे. त्यात आधी ज्या शेतकऱ्यांनी संमती दिलेली आहे, त्यांचीच जागा संपादित केली जाईल. मग प्राधान्याने त्यांना त्या जागेची रक्कम दिली जाईल. त्यानंतर गुंतवणूकदार किती आणि शेतकरी किती याची छाननी देखील केली जाईल.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये वाद आहे हे मला पत्रकारांकडूनच कळले आहे. असे काही नसून, अतिशय चांगल्या पद्धतीने सरकार चाललेले आहे. मात्र आता खोके- खोके म्हणून आम्ही फुटणार नाही. त्यामुळे या दोघांमध्ये समन्वय नाही हे दाखविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पण विरोधक यात यशस्वी होणार नाहीत.

हेही वाचा : “तुम्ही मुख्यमंत्र्यांकडून सुपारी घेऊन शिवसैनिकांना…”, विनायक राऊतांचा पोलिसांवर गंभीर आरोप

रोहित पवारांनी केलेल्या ट्विट वर बोलताना उदय सामंत म्हणाले की ,त्यांच्या बोलण्यात तथ्य आहे की नाही मला माहित नाही. पण चार दिवसांपूर्वी मीच म्हणालो होतो की राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा ते बारा आमदार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या संपर्कात आहेत, ते योग्यवेळी त्यांचा निर्णय घेतील.

उगाच कोणाला उचकवू नये

भास्कर जाधव यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी बोलताना सामंत म्हणाले की , माझे आजचे आणि कालचे ट्विट तुम्ही पहिले असेल तर त्यातून अनेक बाबी समोर येतात. महाराष्ट्र हा सुसंस्कृत आहे. भावी पिढीचा राजकारणावर विश्वास राहिला पाहिजे, असे वाटत असेल तर बोलताना पात्रता ढासळू देऊ नये. मात्र लोकशाहीमध्ये बोलण्याचे आणि व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे, फक्त याची मर्यादा बाळगायला हवी.

हेही वाचा : “आमच्यासाठी पद हे महत्त्वाचं…” अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर मुरजी पटेलांचं नाराजीबाबत मोठं विधान

उद्धव ठाकरे यांच्या बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी उच्च न्यायालयात जी याचिका दाखल झाली आहे, त्याबाबत मला काही कल्पना नाही. उच्च न्यायालय त्याबाबत ठरवेल. मी त्यांच्यासोबत करताना त्यांच्या मालमत्तेवर लक्ष ठेऊन नव्हतो. मी प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करत होतो.