‘एफटीआयआय’च्या (फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया) आंदोलक विद्यार्थ्यांशी आणखी एकदा चर्चा करण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालय तयार असल्याचे संकेत विद्यार्थी संघटनेला मिळाले आहेत. मात्र अद्याप याबाबत लिखित सूचना प्राप्त झालेली नाही.
संस्थेच्या संचालक मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष अभिनेते गजेंद्र चौहान यांच्या, तसेच इतर चार सदस्यांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या संपाचा बुधवारी ८३ वा दिवस होता. विद्यार्थ्यांशी पुन्हा चर्चा करण्यासाठी मंत्रालयाची तयारी असल्याची माहिती आपल्याला संस्थेचे संचालक प्रशांत पाठराबे यांनी तोंडी दिल्याचे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष नाचिमुथ्थू हरीशंकर यांनी सांगितले. नाचीमुथ्थू म्हणाले,‘अजून माझ्याकडे मंत्रालयाकडून कोणतेही लिखित पत्र आलेले नाही. मंत्रालयाने चर्चेसाठी अधिकृत पत्र पाठवावे यासाठी आम्ही उद्या मंत्रालयाला लिहिणार आहोत. असे पत्र मिळाल्यास होणाऱ्या चर्चेबद्दल स्पष्टता येईल. आम्ही मंत्रालयाला यापूर्वी लिहिलेल्या पत्रात माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांच्याशी चर्चेची इच्छा संघटनेने व्यक्त केली होती. त्यांनी संस्थेत येऊन पाहणी करावी असेही आम्ही म्हटले होते. मंत्रालय चर्चेसाठी तयार असेल तरी विद्यार्थी दिल्लीत जाणार की अधिकारी संस्थेला भेट देणार या विषयी अद्याप माहिती नाही. संस्थेतील कंत्राटी कामगारांना काढून टाकण्याचा निर्णय पुढे ढकलण्याची मागणीही केली होती, संचालकांनी मंगळवारी तो निर्णय पुढे ढकलला.’संस्थेचे संचालक पाठराबे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. ३ जुलै रोजी माहिती व प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी विद्यार्थ्यांशी केलेली चर्चा असफल ठरली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा