पुणे : भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला करून शाळकरी मुलाला लक्ष्य केले. सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास झालेल्या या हल्ल्यात सायकलचे हँडल पोटात घुसल्यामुळे १२ वर्षीय मुलाचे आतडे बाहेर आले. या घटनेत गंभीररित्या जखमी झालेल्या मुलाला तातडीने मदत देखील मिळाली नसल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे विभाग प्रमुख महेश पोकळे यांनी रुग्णवाहिका बोलवून मुलाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अर्जुन सुपेकर (वय १२ रा. लेन नंबर २३ ब गणेश नगर, धायरी ) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. गणेश नगर याच परिसरातील एका वासरूवर चार दिवसांपूर्वी भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. यामध्ये वासराचे शेपूट तुटले. त्यानंतर याच परिसरात राहणाऱ्या मुलावर कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे मुलगा मोठ्या प्रमाणात जखमी झाला आहे. सध्या या मुलाच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याचा हात फॅक्चर झाला आहे.
धायरी परिसरात गेल्या काही महिन्यापासून भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून यामुळे अनेकजण जखमी झाले आहेत. तसेच रात्री अपरात्री कुत्र्याची टोळकी नागरिकांवर हल्ला करत आहेत त्यामुळे अपघातही झाले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. महापालिकेच्या पथकाने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
धायरीत भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून रात्री जवळपास या परिसरात शंभरच्यावर कुत्र्यांची टोळी पाहायला मिळत आहे. वेळीच या कुत्र्याचा बंदोबस्त करून त्यांच्यासाठी एक केंद्र उभारावे. अशा घटना घडू नयेत यासाठी महापालिका प्रशासनाने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. – महेश पोकळे, विभाग प्रमुख, शिवसेना</strong>
धायरीतील भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी मुख्य खात्याला कळविण्यात येणार असून अशा घटनांवर आळा घालण्यात येईल.- प्रदीप आव्हाड, सहायक आयुक्त, सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय