पुणे: हडपसर ओैद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात चेष्टा मस्करीतून काॅम्प्रेसर यंत्रातील हवा पाइपद्वारे अल्पवयीन मुलाच्या पोटात सोडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोतीलाल साहू (वय १६, मूळ रा. मध्य प्रदेश) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारखान्यातील कामगार धीरजसिंग गोपालसिंग गौड (वय २१) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत मोतीलालचा मामा शंकरदिन रामदिन साहू (वय ३४, रा. बडागाव, जि. कटनी, मध्य प्रदेश ) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हडपसर येथील ओैद्योगिक वसाहतीत पूना फ्लोअर अँड फूडस कारखाना आहे. या कारखान्यात मोतीलालचा मामा शंकरदिन आणि आरोपी धीरजसिंग कामाला आहे. कारखान्यातील आवारात ते राहायला आहेत, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे यांनी दिली.

हेही वाचा… सावित्रीबाई पुणे विद्यापीठात बसने फिरा मोफत!

दोन महिन्यांपूर्वी मोतीलाल मामा शंकरदिनकडे आला होता. सध्या तो काही काम करत नव्हता. मामाबरोबर कारखान्याच्या आवारात तो राहायला होता. मोतीलाल आणि आरोपी धीरजसिंग यांची मैत्री झाली. दोन दिवसांपूर्वी कारखान्यात तिसऱ्या मजल्यावर धीरजसिंग काम करत होता. मैदा तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्राची सफाई काॅम्प्रेसरमधील हवेचा वापर करुन केली जाते. धीरजसिंग काम करत होता. मोतीलाल तेथे थांबला होता. चेष्टा मस्करीतून धीरजसिंगने काॅम्प्रेसर सुरू केला. हवेचा पाइप मोतीलालच्या गुदद्वाराजवळ लावला. पाइपमधील हवा पोटात शिरल्याने मोतीलाल जागीच कोसळला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. चौकशीत चेष्टा मस्करीतून हवेचा पाइप धीरजसिंगने मोतीलालच्या गुदद्वाराजवळ लावल्याने हवा पोटात शिरल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. चौकशीनंतर याप्रकरणी धीरजसिंगविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minor boy dies after air from the compressor released into his stomach pune print news rbk 25 dvr