लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : नवरात्रोत्सवात दांडीया खेळताना झालेल्या भांडणातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने १७ वर्षीय अल्पवयीन मुलाच्या चेहरा आणि पाठीत धारदार चाकूने वार करत खून केला. ही घटना निगडी, रुपीनगर येथे घडली.
मोहम्मद सैफून बागवान (वय १७, रा. अजिंक्यतारा हौसिंग सोसायटी, रूपीनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला निगडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मोहम्मद आणि अल्पवयीन मुलाचे नवरात्रोत्सवात दांडीया खेळताना सात दिवसांपूर्वी भांडण झाले होते. मंगळवारी सायंकाळी मोहम्मद आणि त्याचा साथीदार आरोपीला जाब विचारण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपीने तुला जीवे मारल्याशिवाय सोडत नाही, असे म्हणत त्याच्याकडील धारदार चाकूने मोहम्मदच्या चेहरा आणि पाठीत वार केले. यामध्ये मोहम्मद गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
दरम्यान, मोहम्म्द आणि त्याच्या साथीदारानेही आरोपीच्या डोक्यात कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आरोपीने वार चुकवत हात मध्ये घातला. यात त्याच्या हाताच्या बोटांना दुखापत झाली. याप्रकरणी मोहम्मद आणि त्याच्या साथीदारावरही जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.