पिंपरी-चिंचवडमध्ये प्रेमप्रकरणातून १८ वर्षीय तरुणाचं मित्रांनीच अपहरण करून त्याचा खून केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात सात अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. कृष्णा रेळेकर असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी २३ वर्षीय तरुणाला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी एमआयडीसी परिसरात राहात असलेल्या कृष्णाचं दोन दिवसांपूर्वी रात्री ९.३० च्या सुमारास मित्रांनी राहत्या घरातून अपहरण केलं. तेव्हा त्याची आई घरीच होती. सर्व मुलं ओळखीची असल्याने त्यांनी काही विचारलं नाही. ते सर्व एकत्र घराबाहेर पडले, परंतु, मुलगा परत आला नाही म्हणून त्यांनी सर्वत्र विचारपूस केली. तेव्हा त्याला काही जणांनी मारहाण केली असल्याचं सांगण्यात आलं. कृष्णाच्या आईने पोलीस ठाणे गाठले. ज्यांनी मारहाण केली त्यांची नाव पोलिसांना सांगण्यात आली. यानंतर एका २३ वर्षीय आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता जुने भांडण आणि प्रेमप्रकरणातून त्याचा खून केल्याचं उघड झाल.
एक अल्पवयीन मुलगी कृष्णासोबत बोलायची, त्याच मुलीवर अल्पवयीन चौघांचं प्रेम होतं असं सांगण्यात येत आहे. याच रागातून कृष्णाचे अपहरण करून त्याला चाकण परिसरातील शेलपिंपळगाव परिसरात नेले. तिथं त्याचा दगडाने ठेचून खून केला. या प्रकरणी आठ पैकी २३ वर्षीय आरोपीला ताब्यात घेतलं असून सात अल्पवयीन मुलं फरार आहेत. त्यांचा शोध पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरी एमआयडीसी पोलीस घेत आहेत.