पुणे : मौजमजेसाठी वाहन चोरी करणाऱ्या अल्पवयीनाला वारजे पोलिसांनी ताब्यात घेतले. अल्पवयीनाकडून पाच दुचाकी आणि दोन रिक्षा जप्त करण्यात आल्या. त्याने वारजे, राजगड, भोसरी, येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरीचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. शहरात वाहन चोरीचे गुन्हे वाढीस लागले आहेत.

उपनगरातून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण जास्त आहे. यापार्श्वभूमीवर वारजे पोलिसांचे पथक गस्त घालत होते. वारजे भागातील बारटक्के रुग्णालयातजवळ अल्पवयीन दुचाकीस्वार थांबला होता. त्याने दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याची माहिती तपास पथकातील पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी अल्पवयीनाच्या पालकांशी संपर्क साधला. चौकशीत त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पाच दुचाकी आणि दोन रिक्षा जप्त करण्यात आल्या. वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय नरळे, पोलीस कर्मचारी शरद पोळ, योगेश वाघ, सागर कुंभार यांनी ही कारवाई केली.

Story img Loader