पुण्यातील मुंढव्याच्या केशवनगर भागात नातेवाईकाकडे शाळेच्या सुट्टीसाठी आलेल्या बारा वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. या प्रकरणी एका महिलेसह चौघांना 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मनोज सुरेश जाधव (21), वर्षा धनराज गायकवाड (32), अजय दिपक जाधव (22 तिघेही रा. सर्वोदय कॉलनी, आनंदनगर, मुंढवा) आणि प्रशांत गुरूनाथ गायकवाड (28, रा. रक्षकनगर, खराडी) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या चौघा आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंढवा केशवनगर येथील पिंगळेवस्ती येथे पीडित मुलगी एका नातेवाईकाकडे 13 एप्रिल 2016 ते 25 मे 2016 दरम्यान राहण्यास आली होती. तेव्हा तिला आरोपी वर्षा ही रक्षकनगर येथील आरोपी प्रशांत गायकवाड याच्या घरी घेऊन गेली आणि आरोपी मनोज जाधव याच्याबरोबर गप्पा मारण्यास सांगितले. त्यानंतर काही वेळाने वर्षाने मनोज तुला कसा वाटतो, तु त्याच्याशी बोलत जा, ते तुला सगळी मदत करेल, त्याच्याबरोबर लग्न कर, शरीरसंबंध ठेव असे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी 14 मे 2016 रोजी वर्षा पीडित तरुणीला एका इमारतीच्या रूममध्ये घेऊन गेली, तिथे प्रशांत आणि अजयने तिचे हात-पाय धरले आणि मनोजने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली. या प्रकरणावर आज झालेल्या सुनावणीत 20 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.