पिंपरी : रावेत येथील क्रिएटिव्ह ॲकॅडमी या निवासी शाळेतील दहावीच्या विद्यार्थिनीवर संचालकानेच लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संचालक नौशाद अहमद शेख (वय ५८) आणि त्याला मदत करणाऱ्या शाळेच्या माजी विद्यार्थिनीला पोलिसांनी अटक केली आहे. १६ वर्षीय पीडित मुलीच्या वडिलांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शेख हा रावेत येथे क्रिएटिव्ह ॲकॅडमी ही निवासी शाळा चालवतो. २०२१ मध्ये पीडित मुलीच्या वडिलांनी तिला नववीमध्ये या निवासी शाळेत दोन लाख २६ हजार रुपये भरून प्रवेश घेऊन दिला. शाळेतील मुलींच्या वसतिगृह इमारतीच्या पहिल्या मजल्यावर शेख राहतो. त्याने पीडित मुलीला २०२२ मध्ये सदनिकेत बोलावून विनयभंग करून मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केला, तेव्हा तिने विरोध केला. त्यानंतर ‘तुझ्या घरच्यांना फोन करून तुझे येथील मुलांबरोबर संबंध असल्याचे सांगेन’ असे तो धमकावू लागला. दिवाळीच्या सुट्टीतही अत्याचाराचा प्रयत्न केला. एका माजी विद्यार्थिनीनेही पीडित मुलीला शेखसोबत संबंध प्रस्थापित करण्याबाबत दबाव आणला, असे फिर्यादीत म्हटले आहे. दोन वर्षे हा प्रकार सुरू होता. त्यामुळे घाबरल्याने मुलगी तेथे राहण्यास तयार नव्हती. तिला आई-वडिलांनी गावाकडे नेले. अखेर तिने ११ जानेवारी २०२४ रोजी याबाबत आई-वडिलांना सांगितले.
हेही वाचा >>>धक्कादायक: अभ्यास करण्यावरून आई मुलाला रागावली, १३ वर्षीय मुलाने घेतला गळफास
या गुन्ह्यात पीडितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस आयुक्तांनी तपासासाठी गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ यांची विशेष तपास अधिकारी म्हणून नेमणूक केली असल्याचे पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी सांगितले. दरम्यान, शेख याला दहा वर्षांपूर्वीही अटक झाली होती. त्याच्या विरोधात एका विद्यार्थिनीने ३० ऑक्टोबर २०१४ रोजी लैंगिक शोषण होत असल्याची तक्रार केली होती.