लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : फर्ग्युसन रस्त्यावरील पबमध्ये अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या तरुणांची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी आता ‘त्या’ मुलांचा शोध सुरू केला असून, त्यांनी एका रात्रीत ८० ते ८५ हजार रुपये उडवल्याचे उघडकीस आले आहे. पबमध्ये काही अल्पवयीन मुले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून, त्या रात्री पबमध्ये असणाऱ्या ४० ते ४५ मुलांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

फर्ग्युसन रस्त्यावरील लिक्वीड,लिजर, लाऊंज (एल थ्री) पबमधील प्रसाधनगृहात काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर खळबळ उडाली. मध्यरात्रीनंतर पब सुरू असल्याची माहिती उघडकीस आल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक कारवाईचे आदेश दिले. पबमालकासह, चालक, व्यवस्थापकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. रात्रपाळीत गस्त घालणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल माने, सहायक निरीक्षक दिनेश पाटील यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. पोलिसांनी पब लाखबंद (सील) केला.

आणखी वाचा-“भाजपा-शिंदे गटाच्या सरकारमुळे पुणे बदनाम होत आहे”; ड्रग्ज प्रकरणावरून जयंत पाटलांची टीका; म्हणाले, “सत्ताधाऱ्यांचा…”

या घटनेनंतर पोलिसांनी रविवारी मध्यरात्री पबमधील प्रसाधनगृहात अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या तरुणांचा शोध सुरु केला आहे. त्या तरुणांनी ८० ते ८५ हजार रुपयांचा खर्च केल्याची माहिती मिळाली आहे. पबमध्ये काही अल्पवयीन मुले असल्याची शक्यता आहे. त्या रात्री पबमध्ये असलेल्या ४० ते ४५ तरुणांची चौकशी सुरू करण्यात आली असून, त्यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत असल्याची माहिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी दिली.

पबमध्ये अमली पदार्थांचे सेवन करणारे तरुण मध्यरात्री पाठीमागील दरवाज्याने पबमध्ये शिरले. पबमध्ये येण्यापूर्वी त्यांनी पार्टी केल्याची माहिती चौकशीत मिळाली आहे. पबमधील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.