हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुण्यातील संगीतवेडय़ांना ‘मिरजकर म्युझिकल’ हे नाव फार जवळचे. संगीतवेडय़ा नसणाऱ्यांनीही गणपती चौकाजवळचे मिरजकरांचे दुकान कधी ना कधी पाहिलेले असते. शास्त्रीय संगीतात वापरल्या जाणाऱ्या वाद्यांच्या निर्मात्यांमध्ये हे नाव आदराने घेतले जाते. मिरजेहून आलेल्या बंधूंनी पुण्यात या परंपरेला सुरूवात केली आणि पुढच्या पिढय़ांनी ती जगभर पोहोचवली.
लक्ष्मी रस्त्यावर काकाकुवा मॅन्शन इमारतीत कोपऱ्यावर एक छोटेसे दुकान आहे. ‘यूसुफ मिरजकर्स म्युझिकल’. दुकान इतके छोटे, की नुसते पाहून त्यांची महती कळणार नाही. याच इमारतीत दुसऱ्या मजल्यावर मिरजकरांचा आणखी एक गाळा आहे. कुठे हार्मोनियमच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे, तर कुठे कुणी तंबोऱ्याचा सूर लावून पाहात आहे, असे सारे चित्र. ‘‘बेसुर आहे रे..पंचम किधर जा रहा हैं देखो..,’’ साजिद मिरजकर सूर लावून पाहणाऱ्याला काही सूचना देतात. त्यांच्या कामाचा व्याप एव्हाना लक्षात येऊ लागलेला असतो आणि साजिद यांच्याशी बोलायला सुरूवात केल्यावर त्यांच्या सात पिढय़ांच्या वाद्यनिर्मितीच्या सुरेल प्रवासाने थक्क व्हायला होते.
मिरजकरांचे पूर्वज शिकलगार. त्यांचा मूळचा व्यवसाय तलवारी आणि इतर हत्यारे बनवण्याचा. त्यापूर्वी संगीत वाद्यांचे काम केवळ कोलकात्याला होत असे. त्यामुळे कोणतीही वाद्ये दुरुस्तीसाठी तिथे पाठवली जात होती. सांगलीच्या पटवर्धन महाराजांकडे मोठे गायक- वादक सादरीकरणासाठी येत असत. मिरजकरांचे पूर्वज फरीदसाहेब शिकलगार (नंतर सतारमेकर या आडनावाने त्यांना ओळखले जाऊ लागले) यांना संगीत ऐकण्याची खूप आवड होती. हत्यारांचे काम त्यांना अवगत असल्यामुळे वाद्यांच्या जुजबी दुरुस्तीतही ते लक्ष घालत. पुढे हत्यारांचे काम कमी झाले आणि दुरुस्तीपासून सुरू झालेला वाद्यांचा व्यवसायच पुढे मोठा झाला. १८५० मध्ये पहिला तंबोरा बनवला गेला आणि वाद्यनिर्मितीतील त्यांची वाटचाल सुरू झाली. मिरजकरांना सुरूवातीचा काळ खूप कठीण गेला. तंतूवाद्यांसाठी हवा तसा भोपळा मिळायचा नाही, छत्रीच्या काडय़ा ठोकून त्याच्या तारा बनवल्या जायच्या, वाद्यासाठी नैसर्गिक रंग वापरले जायचे. अशा अनेक मर्यादांमुळे तेव्हा वाद्यांचे काम आताएवढे सफाईदार होत नसे. त्यामुळे ओबडधोबडपणात सफाई आणण्यासाठी विशेष विचार करावा लागायचा. वाद्यांसाठीची हत्यारेही फरीदसाहेब यांना स्वत: तयार करावी लागायची. तंबोऱ्यानंतर ते सतारीचीही बांधणी करू लागले आणि हळूहळू सर्व भारतीय वाद्यांच्या निर्मितीत मिरजकरांचा हातखंडा झाला.
पुढच्या पिढय़ांमध्ये वाद्यांचे अतिशय कुशल कारागीर उमरसाहेब सतारमेकर आणि त्यांचे बंधू प्रभात स्टुडिओमध्ये वाद्यांच्या दुरुस्तीचे काम करू लागले. हा स्टुडिओ जेव्हा कोल्हापूरहून पुण्यास आला तेव्हा त्याबरोबर या बंधूंनाही पुण्यात बोलवून घेण्यात आले. काकाकुवा मॅन्शनमधील दुकान त्यांनीच सुरू केले. मिरजेचे ‘मिरजकर बंधू’ अशा नावाने त्यांना सर्व जण ओळखू लागले आणि पुढे तेच नाव कायम राहिले. पं. भीमसेन जोशी, पंडिता किशोरी आमोणकर, उस्ताद रईस खाँ अशा संगीतातील कित्येक थोर मंडळींसाठी मिरजकरांनी वाद्ये बनवून दिली आहेत. इराणहून आलेल्या एका ग्राहकाला ‘जेंटस्’ तंबोऱ्याच्या आकाराची सतार हवी होती. अशा खास मागण्याही त्यांनी पुरवल्या. केवळ भारतातच नव्हे, तर जगाच्या कानाकोपऱ्यात मिरजकरांची वाद्ये पोहोचली आहेत.
पाश्चात्त्य प्रकारची वाद्ये मिरजकर ठेवत नाहीत, ते केवळ शास्त्रीय संगीतातील वाद्येच बनवतात. साजिद यांनी २००६ मध्ये पाश्चात्त्य वाद्यांची विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला. आपणे जी वाद्ये बनवत नाही ती विकायची नाहीत, आणि फक्त शास्त्रीय वाद्येच ठेवली की त्याकडे पुरेपूर लक्ष देता येईल, असा त्यांचा विचार होता. संगीतवाद्यांच्या दुकानांमध्ये हे मिरजकरांचे एक वैशिष्टय़च म्हणावे लागेल.
मिरजकरांची सर्व तंतूवाद्ये मिरजमध्ये बनतात, तर हार्मोनियम आणि तबले पुण्यात बनवले जातात. साजिदभाई यांचे आजोबा इस्माईलभाई यांनी पुण्यात मिरजकरांचे नाव मोठे केले. त्यांना सर्व तंतूवाद्ये वाजवताही येत होती. त्यांचे पुत्र यूसुफ मिरजकर यांनी वाद्ये देशाबाहेरही पोहोचवली. साजिद हे अगदी लहानपणापासून दुकानात येत. वडिलांना काम करताना पाहून, त्यांच्याकडून त्यांनी शिकून घेतले. साजिद यांचा मुलगा आता दहावीत आहे. त्यालाही मिरजेला वाद्यांचे काम शिकण्यास पाठवले आहे, असे ते कौतुकाने सांगतात. हा व्यवसाय हातावर चालणारा. त्यामुळे दर महिन्याला किती वाद्ये बनवता येईल यावर काही मर्यादा असतात. त्यामुळे व्यवसायवृद्धीपेक्षा आहे तो व्यवसाय उत्तम सांभाळण्याकडे लक्ष देत आहोत, असे साजिद सांगतात.
sampada.sovani@expressindia.com