पंढरपूरमधील वैविध्यपूर्ण माणसांनी विनोदासाठी पुरविलेले खाद्य.. लग्नात नाही, पण कथाकथनासाठी मराठवाडय़ामध्ये घोडय़ावरून प्रवास करताना खोगीर घसरल्यामुळे झालेली फजिती.. निर्माते आणि अभिनेत्री यांच्यातील भांडणामुळे चित्रपटासाठी पटकथालेखनामध्ये करावी लागलेली कसरत.. अशा धमाल किश्श्यांची पेरणी करीत ‘विनोदाच्या आख्याना’तून हास्यकल्लोळामध्ये ‘दमां’ची ‘मिरासदारी’ रसिकांनी रविवारी अनुभवली. सध्याचा काळ खडतर असला तरी पुन्हा विनोदाला चांगले दिवस येतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
‘अक्षरधारा’तर्फे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांच्या ८६व्या वाढदिवसानिमित्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते पुणेरी पगडी आणि उपरणे प्रदान करून सत्कार करण्यात आला. विनोदाच्या प्रांतातील ‘दादां’ची ग्रंथतुला करण्यात आली. या ग्रंथतुलेतील पुस्तके नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि सातारा जिल्हय़ातील कोरेगाव येथील शाळेस भेट देण्यात आली. उत्तरार्धात प्रा. मिलिंद जोशी यांनी द. मा. मिरासदार यांच्याशी संवाद साधला. त्यापूर्वी अप्पा बळवंत चौकातील अक्षरधारा बुक डेपोचे उद्घाटन मिरासदार यांच्या हस्ते झाले. रसिका राठिवडेकर, डॉ. संजीवनी देवरे आणि डॉ. संजयकुमार देवरे याप्रसंगी उपस्थित होते.
बाबासाहेबांनी माझा केलेला गौरव म्हणजे ‘तेजाने ज्योतीची आरती’ करावे असेच आहे, अशी कृतज्ञतापूर्व भावना व्यक्त करून द. मा. मिरासदार म्हणाले, मराठीच्या सध्याच्या अवस्थेला काही प्रमाणात शिक्षक कारणीभूत असून त्यांनी वाचन केले पाहिजे. आचार्य अत्रे आणि चिं. वि. जोशी यांच्या विनोदाचा संस्कार माझ्यावर आहे. अत्रेंचा रासवट विनोद पुलंनी सुसंस्कृत केला. अभिजात विनोदाने माणसाला हसू यावे आणि आनंद मिळावा.
बाबासाहेब पुरंदरे म्हणाले, की मिरासदारांशी मैत्री हा माझा उत्तम दागिना आहे. असा निर्मळ मनाचा माणूस साहित्यिकांमध्ये मिळणे दुर्मिळ आहे. सहज विनोद ही त्यांची अंत:प्रेरणा आहे. विनोद ही परमेश्वराची देणगी आहे. तर मिरासदार हे सरस्वतीचं लेणं आहेत. मिरासदार, व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, पुलं यांनी आपल्याला चार दशके खळखळून हसविले. आता त्यांच्यानंतर कोण आहेत, महाराष्ट्राची सरस्वती इतकी गरीब का झाली ? ‘अभ्यासोनी प्रकटावे’ असे म्हणताना अभ्यास करणारे कुठे आहेत?
रसिका राठिवडेकर यांनी प्रास्ताविक केले. विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mirasdar honoured by babasaheb purandare
Show comments