अकरावी प्रवेश प्रक्रियेची मुदत संपली असतानाही प्रवेश द्यावा म्हणून गरवारे महाविद्यालयातील प्राचायार्ंशी उद्धटपणाचे वर्तन करत शिपायाला मारहाण केल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी घडला. याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दहा ते पंधरा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत गंगाप्रसाद गुप्ता (वय ६५, रा. कोथरूड) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून जयराज लांडगे, प्रकाश दुर्गे यांच्यासह दहा ते पंधरा कार्यकर्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी गोंधळ, धमकावणे, मारहाण, बेकादेशीरपणे डांबून ठेवणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी बेकायदेशीरपणे गुप्ता यांच्या कार्यालयात प्रवेश केला. अकरावीची प्रवेश प्रक्रियेची तारीख संपली असतानाही प्राचार्य गुप्ता यांना ‘तुम्ही इयत्ता अकरावीचा प्रवेश का स्वीकारला नाही?  प्रवेशासाठी किती अर्ज स्वीकारले, याची आताच माहिती द्या, नाहीतर येथे आत्मदहन करु,’ अशी धमकी दिली. त्या वेळी शिपाई राहुल नामदेव तळेकर यांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना मारहाण करून शिवीगाळ केली. याबाबत गुप्ता यांनी डेक्कन पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हे स्वत: इंडियन कॉमन वेल्फेअर असेम्ब्ली या संस्थेचे सदस्य असल्याचे सांगत होते. पण, त्यांच्या मोटारीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे झेंडे सापडले असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नसून आरोपींचा शोध सुरू आहे.

Story img Loader