पुणे : हिंजवडीतून आठवड्यापूर्वी बेपत्ता झालेल्या संगणक अभियंता तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तरुणाचा मृतदेह पुणे-नाशिक महामार्गावरील सांडभोरवाडीतील वनविभागाच्या मोकळ्या जागेत सापडला. तरुणाच्या खुनामागचे कारण समजू शकले नाही. ग्रामीण पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> पुणे : राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे यांना अटक; नोकरीच्या आमिषाने ४४ जणांना गंडा
सैारभ नंदलाल पाटील (वय २२) असे खून झालेल्या संगणक अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाटील याचा खून नेमका कोणत्या कारणावरुन झाला, यादृष्टिने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी पथके तयार केली आहेत.
पाटील हा मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीचा आहे. तो हिंजवडीतील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत काम करत होता. तो हिंजवडी भागात राहायला होता, अशी माहिती खेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी दिली.
सौरभ हा २८ जुलै रोजी बेपत्ता झाला होता. कुटुंबीयांनी त्याच्याशी संपर्क साधला होता. मात्र, कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने कुटुंबीयांनी तो बेपत्ता झाल्याबाबतची तक्रार हिंजवडी पोलीस ठाण्यात नोंदविली होती.
हेही वाचा >>> पुणे: महाविद्यालयांनी प्रणालीत गुण न भरल्याने विद्यार्थ्यांचे निकाल राखीव
दरम्यान, खेड तालुक्यातील होलेवाडी गावात बेवारस अवस्थेत पोलिसांना एक दुचाकी सापडली. दुचाकीच्या क्रमांकावरुन पोलिसांनी शोध घेतला. पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या सांडभोरवाडीत वन विभागाची मोकळी जागा आहे. तेथे सौरभचा मृतदेह सापडला. शवविच्छेदन अहवालात सौरभ याचा खून झाल्याचे उघडकीस आले.
नोकरीचा राजीनामा देऊन बेपत्ता सौरभ काही महिन्यापूर्वी हिंजवडीतील माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कामाला लागला होता. २८ जुलै रोजी तो बेपत्ता झाला. बेपत्ता होण्यापूर्वी त्याने राजीनामा दिल्याची माहिती पोलिसांना तपासात मिळाली आहे. त्याच्या खुनामागचे कारण समजू शकले नसून, पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.