नारायणगाव : पुणे-नाशिक महामार्गावर भरधाव टेम्पोच्या धडकेत प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्हॅनमधील नऊ प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर घटनास्थळावरुन पसार झालेल्या टेम्पोचालकाला पोलिसांनी चाकण परिसरातून अटक केली. नारायणगाव अपघात प्रकरणात रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एसटी बसवर प्रवासी व्हॅन आदळली होती. धोकादायक पद्धतीने रस्त्याच्या कडेला एसटी बस लावल्याने पोलिसांनी एसटी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी टेम्पोचालक रोहितकुमार जगमालसिंग चौधरी (वय ३०, रा. मोहमदपूर जाट, ता. बावल, जि. रेवाडी, हरयाणा) याला अटक करण्यात आली. एसटी बसचालक भाऊसाहेब भास्कर जायभाय (रा. महाबळेश्वर, जि. सातारा) याला अटक करण्यात आली, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली. टेम्पोचालक चौधरी याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. एसटी बसचालक जायभाय यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. भरधाव टेम्पोने प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्हॅनला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात नऊ जण ठार झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव परिसरात घडली. अपघातात आठ जण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर पंचक्रोशीत शोककळा पसरली.
हेही वाचा – पिंपरी : सावकारी जाचाला कंटाळून कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; आई-मुलाचा मृत्यू, वडील बचावले
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. अपघातानंतर पसार झालेल्या टेम्पोचालकाला अटक करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यानंतर पोलीस अधीक्षक देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी तपास करुन टेम्पोचालक चौधरीला चाकण परिसरातून ताब्यात घेतले.
हेही वाचा – उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्याला धक्काबुक्की, गावठी दारुचा टेम्पो घेऊन आरोपी पसार
अपघातानंतर चौधरी हरयाणात पसार होण्याच्या तयारीत होता. त्याला अटक करुन जुन्रर न्यायालयात शनिवरी हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. एसटी बसचालक जायभाय यालाही अटक करुन न्यायलायात हजर करण्यात आले. जायभायला १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.