देशभरात कुठेही बॉम्बस्फोट झाला की जिथे संशयाची सुई जाते आणि अनेक नामचीन व फरार गुंडाचे आश्रयस्थान असलेल्या चिखली-कुदळवाडीतील भंगार व्यावसायिकांचा ‘पंचनामा’ करण्याचे आदेश पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी उपायुक्त शहाजी उमाप यांना बुधवारी दिले. कुदळवाडीतील भंगार व्यावसायिक कुठून आले, ते काय खरेदी-विक्री करतात, कोणत्या गुन्हात ते सापडले होते का, येथे कोणाकोणाचा वावर असतो, अशी माहिती एकत्र करा, असेही ते बजावले.
पिंपरीत लघुउद्योजक संघटनेच्या एका कार्यक्रमासाठी आलेल्या पोळ यांनी औद्योगिक परिसरातील गुन्हेगारीचा आढावा घेतला. पोलीस खात्याच्या मर्यादा व अडचणीही मांडल्या. या वेळी बोलताना त्यांनी कुदळवाडीतील भंगार व्यावसायिकांच्या सर्व उद्योगांचा पंचनामा करण्याचे आदेश दिले. या वेळी आमदार विलास लांडे, माजी महापौर संजोग वाघेरे, नगरसेवक संजय वाबळे, सुरेश म्हेत्रे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी व लघुउद्योजक उपस्थित होते. औद्योगिक परिसरात होणाऱ्या चोऱ्या, विशेषत:  महिला व लहान मुलांकडून होणारे गुन्हे रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजण्याचे आदेश त्यांनी दिले. पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या नागरिकांशी सौजन्याने वागा, त्यांना सल्ले देत बसू नका, आवश्यक ती कार्यवाही करा. पोलीस आयुक्त म्हणून आपल्याला यशस्वी करायचे की ‘फेल’ ठरवायचे, ते तुमच्या हातात आहे. त्यानुसार, आपली कामे जबाबदारीने पार पाडा, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी आपल्या अधिकाऱ्यांना केले.