कसबा पेठेतील वाडय़ांची भिंत कोसळून झालेल्या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर वाडय़ांच्या पुनर्विकासाचा प्रश्न पुन्हा अधोरेखित झाला आहे. जुन्या पुण्यातील वाडे पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असले आणि त्यासाठी जादा एफएसआय देण्याची गरज असली, तरी होता तोच एफएसआय कमी करण्याची गंभीर चूक महापालिका प्रशासनाने विकास आराखडय़ात केल्यामुळे वाडय़ांच्या विकासापुढे मोठेच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
कसबा पेठेतील दुर्घटनेनंतर वाडय़ांच्या जीर्ण झालेल्या बांधकामांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. वाडय़ांच्या विकासासाठी सध्या शहरात दोन चटईक्षेत्र निर्देशांक (फ्लोअर स्पेस इंडेक्स- एफएसआय) उपलब्ध आहे. उपलब्ध होणारा एफएसआय, वाडय़ाचे क्षेत्रफळ आणि वाडय़ांमधील भाडेकरूंची संख्या यांचे प्रमाण व्यस्त असल्यामुळे वाडय़ांचा पुनर्विकास करण्यासाठी विकसक पुढे येत नाहीत. अशा परिस्थितीत जुन्या पुण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखडय़ात वाडे विकासाला चालना देण्यासाठी अडीच एफएसआय करावा, अशी मागणी होती.
प्रत्यक्षात अर्धा एफएसआय वाढवण्याऐवजी होता तोच एफएसआय कमी करण्यात आल्याची वस्तुस्थिती आहे. ही बाब मध्य पुण्यातील नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्याही लक्षात आली नव्हती. नगरसेवक संजय बालगुडे यांनी प्रशासनाने वाडय़ांचा एफएसआय दीड केल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिल्यानंतर महापालिकेने ही ‘प्रिंटिंग मिस्टेक’ असल्याचा दावा केला आणि स्वत:च्या चुकीवर पांघरूण घातले. ही मुद्रणातील चूक असली, तरी या चुकीमुळे वाडय़ांच्या विकासाला तर ब्रेक लागला आहेच, शिवाय दोन एफएसआयनुसार परवानगी दिलेली सर्व बांधकामे थांबवण्याच्याही नोटीस संबंधितांना देण्यात आल्या आहेत. तूर्त तरी ही चूक लोकप्रतिनिधींची, शहर सुधारणा समिती का प्रशासन का राज्य शासन दुरुस्त करणार आणि ती कधी दुरुस्त होणार असे प्रश्न उपस्थित झाले असून अद्याप ते अनुत्तरितच आहेत.
आधी चूक सुधारा – बापट
एफएसआय बाबत चूक झालेली चूक नाही, तर ती हेतुत: केलेली, जाणूनबुजून केलेली चूक आहे. ती चूक आधी महापालिकेने दुरुस्त करावी, अशी मागणी आमदार गिरीश बापट यांनी बुधवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना केली. दोन आकडय़ाऐवजी तेथे वीस, दोनशे वा तसाच आकडा मुद्रणात चुकीने येऊ शकतो; पण दोन एफएसआयच्या जागी दीड आकडा येणे ही हेतूपूर्वकच केलेली चूक आहे, असे सांगून ते म्हणाले, की वाडय़ांच्या दुरुस्तीसाठीच्या परवानग्याही महापालिकेने देणे आवश्यक आहे. तशा दिल्या जात नसल्यामुळे वाडय़ांची पडझड होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा