बजाज ऑटो व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यात चाकण येथील प्रकल्पावरून सुरू असलेला तिढा मिटण्याची चिन्हे नसल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. ‘विनाशर्त काम सुरू केल्याशिवाय चर्चा नाही व कंपनी दबावाला बळी पडणार नाही,’ असे व्यवस्थापनाने स्पष्ट केले. तर, कामगारांच्या

न्याय्य मागण्या मान्य न केल्यास आंदोलन अधिक उग्र करण्याचा इशारा विश्वकल्याण कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप पवार यांनी दिला आहे.
कामगारांना शेअर मिळावेत, कामगारांवर केलेल्या कारवाया मागे घ्याव्यात, नवीन करारावर बोलणी करावी आदी मागण्यांसाठी विश्वकल्याण कामगार संघटनेच्या वतीने २५ जूनपासून काम बंद आंदोलन सुरू आहे. चाकण येथे सुरू झालेल्या आंदोलनाचे पडसाद आकुर्डीत उमटले असून आता व्यवस्थापन व संघटना अशा दोन्हींकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप श्रीवास्तव, उपाध्यक्ष कैलाश झांजरी, अमृत रथ यांनी सोमवारी कंपनीची भूमिका पत्रकार परिषेदत मांडली. त्यांनी संघटनेचे सर्व आरोप फेटाळले व कामगारांना शेअर देण्याची मागणीही धुडकावून लावली. ‘‘कामगारांचा संप बेकायदा असून दिलीप पवार त्याला कारणीभूत आहेत. ते नकारार्थी भावनेतून कामगारांना चिथावणी देत आहेत. कामगारांना दमदाटी व धमक्या दिल्या जात असून तशा १५ तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या आहेत. कंपनीचे उत्पादन जाणीवपूर्वक घटविले जात आहे. पवार यांना पंतनगर येथील प्रकल्पामध्ये प्रवेश हवा होता. तो मिळाला नाही म्हणून ते सूडबुद्धीने वागत आहेत. कंपनीकडून चांगल्या सुविधा दिल्या जात आहेत. याबाबत संघटनेकडून होणाऱ्या तक्रारी चुकीच्या आहेत. चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. मात्र, तोडगा निघत नाही. कामगारांनी विनाशर्त कामावर यावे,’’ असे आवाहन करतानाच आम्ही दबावाला बळी पडणार नसल्याचे कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले.
यासंदर्भात, दिलीप पवार यांनी पत्रकारांना सांगितले, आपण कामगारांना भडकावले नाही. आपण पंतनगरला गेल्याचा व्यवस्थापनाला राग आहे. कामगारांवर कारवाईचे सत्र थांबवावे, यापूर्वीची कारवाई मागे घ्यावी. कामगारांसाठी शेअर द्यावेत, तो त्यांचा अधिकार आहे. ते का देता येत नाहीत, यावर चर्चा करावी, असे संघटनेचे म्हणणे आहे. पाच वर्षांत एखादा वेतनकरार करणाऱ्या कंपनीकडून कामगारांचे आर्थिक, शारीरिक व मानसिक शोषण केले जाते. उत्पादन आम्ही कमी केले नसून ते मंदीच्या काळात कमी झाले आहे. न्याय्य हक्क मिळेपर्यंत हा लढा सुरू राहणार असून वेळप्रसंगी आणखी तीव्र आंदोलन करू, असे पवार यांनी म्हटले आहे.