पिंपरी भाजपच्या अंतर्गत वादावर तोडगा काढण्यासाठी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे मध्यस्थी करणार होते. त्यासाठी ते शहरात येणार होते. प्रत्यक्षात ते फिरकलेच नाहीत. परिणामी पक्षात वर्षांनुवर्षे सुरू असलेला गटबाजीचा तिढा कायम राहिल्याचे चित्र पुढे आले आहे. नेत्यांचेच गटबाजीला खतपाणी असल्याची भावना पक्ष कार्यकर्त्यांमध्ये आहे.
वर्षभरापासून रखडवून ठेवलेल्या िपपरी शहराध्यक्षपदी खासदार गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक सदाशिव खाडेंची २८ ऑगस्टच्या ‘मुहूर्ता’ वर निवड झाली अन् पक्षात उद्रेक झाला. माजी शहराध्यक्ष एकनाथ पवार व त्यांच्या समर्थकांनी रान पेटवले, पदांचे राजीनामे दिले, मुंडे व फडणविसांचा निषेध केला. पुण्यातील प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत काळे झेंडे दाखवू, वेळप्रसंगी मुंडन करू, असा इशारा दिल्याने पक्षश्रेष्ठींचे धाबे दणाणले. फडणविसांना दखल घ्यावी लागली. पवार गट तावडेंच्या संपर्कात असतो व त्यांचे नेतृत्वही मान्य करतो. त्यामुळे राडा करणाऱ्या पवार गटाला शांत करण्याची जबाबदारी तावडेंनाच देण्यात आली. तावडे िपपरीत येऊन दोन्ही गटांशी चर्चा करणार होते. मात्र, ते आले नाहीत. प्रदेशाच्या बैठकीच्या ठिकाणी बेअब्रू नको म्हणून वेळ काढण्याची खेळी झाली. त्यानंतर गणेशोत्सवात ते येतील, असे सांगण्यात आले. मात्र, उत्सवातही ते फिरकले नाहीत. तावडे अंग काढून घेत असल्याची भावना पवार गटात झाली. दुसरीकडे, आपल्याला प्रदेशाकडून ‘अभय’ मिळाल्याचे खाडे सांगू लागले. त्यामुळे खाडेंच्या नियुक्तीमुळे मुळात अस्वस्थ असलेला पवार गट आणखी हवालदिल झाला. खाडेंना सहकार्य करायचे नाही, पक्षात पर्यायी यंत्रणा कार्यरत ठेवायची, असे धोरण त्यांनी ठेवल्याचे दिसते. त्यामुळे एकनाथ पवारांच्या काळात जे दुफळीचे चित्र होते, तेच नव्याने दिसू लागले आहे.
एके काळी भाजपचा मोठा जनाधार असलेल्या िपपरीत भाजपचे स्थान नगण्य ठरले आहे, त्यामुळे मुळात नेते शहरात लक्ष देत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे गटबाजीला नेत्यांचेच खतपाणी असल्याने वाद मिटण्याची शक्यता नसल्याचे कार्यकर्तेच सांगतात. तसे नसले तरी नेत्यांना वाद मिटवायचे आहेत की नाही, असाही प्रश्न विचारला जातो. परिणामी िपपरीतील तिढा अजूनही तसाच आहे.
सहकार आघाडीच्या प्रमुखपदी अॅड. सचिन पटवर्धन
भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य अॅड. सचिन पटवर्धन यांची प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेश सहकार आघाडीच्या संयोजकपदी निवड केली आहे. भाजपच्या सेवा विकास प्रकल्पाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. सध्या ते कर्तव्य फाउंडेशनचे अध्यक्ष व पुणे पीपल्स बँकेचे संचालक आहेत.

Story img Loader