पुणे : धावत्या रेल्वेत आपत्कालीन परिस्थितीत निर्माण झाल्यास साखळी ओढून (चेन पुलिंग) रेल्वे थांबविण्याच्या सुविधेचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असल्याचे समोर आले आहे. परिणामी रेल्वेच्या वेळापत्रक कोलमडणे, प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागण्यासह रेल्वे प्रशासनालाही आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागात गेल्या महिन्यात (फेब्रुवारी) साखळी ओढल्याच्या १३० घटनांची आकडेवारीवरून ही बाब अधोरेखीत झाली आहे.

मध्य रेल्वेत पुणे रेल्वे विभाग अत्यंत महत्वाचा असून विभागातून प्रतिदिवस दोनशेहून अधिक रेल्वे धावतात, तर दीड लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. रेल्वेमध्ये आपात्कालीन परिस्थिती उद्भवल्यास रेल्वे थांबविण्यासाठी साखळी ओढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, या सुविधेचा काही प्रवाशांकडून चुकीच्या पद्धतीने वापर होत असून याचा फटका रेल्वेच्या वेळापत्रकारवर होत आहे. मागून येणाऱ्या सर्व रेल्वेचे वेळापत्रक कोलमडत असून रेल्वे प्रशासनाच्या महसुलावरही याचा परिणाम होत आहे. तसेच रेल्वेतील इतर प्रवाशांना देखील विलंब होत असून याचा फटका सहन करावा लागत आहे. रेल्वे सुरक्षा बल, व्यवस्थापकीय रेल्वे प्रशासन आदींकडून अशा घटना रोखण्यासाठी वारंवार प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, आपात्कालीन परिस्थिती नसताना हेतूपुरस्सर धावत्या रेल्वेतील साखळी ओढून रेल्वे थांबविण्याचे प्रयत्न अद्यापही सुरूच असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

कुंभमेळ्याच्या गर्दीमुळे सेवा विस्कळीत

गेल्या महिन्य़ात कुंभमेळ्यानिमित्त अतिरिक्त रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या होत्या. प्रवाशांची माेठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यामुळे साखळी ओढण्याच्या प्रकार जास्त प्रमाणात घडले असल्याचे समोर आले. फेब्रुवारी महिन्यात साखळी ओढण्याच्या १३० घटना घडल्या आहेत. त्यापैकी ७१ जणांना विनाकारण साखळी ओढून प्रवासी सेवा विस्कळीत केल्याबद्दल अटक केली आहे. तसेच काही व्यक्तींकडून एक हजार रुपयांच्या दंडाप्रमाणे ३१ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

पुणे रेल्वे स्टेशनवर अनेक प्रवासी उशिरा पोहोचतात. त्यामुळे गाडी पकडण्याच्या नादात त्यांचे सहकारी किंवा रेल्वेमधील प्रवासी साखळी ओढतात. त्यासह साहित्य अथवा प्रवासी पिशवी विसरली, जवळच्या नातेवाइकाला रेल्वेत चढता आले नाही, तरी साखळी ओढून रेल्वे थांबविल्याचे प्रकार आढळून आले आहेत. त्यामुळे प्रवाशांनी स्थानकावरून गाडी निघण्याअगोदर पंधरा मिनीट अगोदर दाखल व्हावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

रेल्वे सेवेवर परिणाम

  • नियमित रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत होते
  • प्रवाशांची गैरसोय
  • दुरुस्ती होईपर्यंत विलंब, त्यामुळे इतर रेल्वेच्या वेळेपत्रक कोलमडते
  • विलंबामुळे रेल्वेच्या महसुलात घट होत तोटा

प्रवाशांनी अत्यावश्यक काळातच या सुविधेचा वापर करावा. वैयक्तीक कारणास्तव साखळी ओढून इतर प्रवाशांना बाधा आणून रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम करणाऱे कृत्य करू नये. अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल. – प्रियंका शर्मा, वरिष्ठ सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे, पुणे विभाग.

Story img Loader