शेती, शिक्षण, गावाचा विकास यांसाठी तंत्रज्ञानाच्या वापराबाबत वारीमध्ये जागृती करण्यासाठी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाकडून फिरत्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी एमकेसीएलचे संचालक डॉ. विवेक सावंत, शिक्षणतज्ज्ञ डॉ. राम ताकवले आदी उपस्थित होते. राज्य शासनाचा राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, महाराष्ट्र राज्य ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) यांच्यातर्फे विविध उपक्रम राबवण्यात येतात. शेती आणि गावांच्या विकासासाठी गावपातळीवर तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प आखण्यात आला आहे. मृदा परीक्षण, सुधारित शेती, बियाणे संग्रह, पुनर्निर्मित ऊर्जेचा वापर, पशुधनाचा विकास, कौशल्य विकास अशा विविध गोष्टींसाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत या प्रकल्पांच्या माध्यमातून जागृती केली जाते. त्याचप्रमाणे गाव पातळीवर ही तंत्रज्ञाने उपलब्ध करून दिली जातात.
विविध तंत्रज्ञानांची आणि कार्यपद्धतीची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने वारीच्या माध्यमातून जागृती केली जाणार आहे. ४ ते १० जुलै या कालावधीत फिरत्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर ७ ते १० जुलै दरम्यान गोपाळपूर येथेही प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. महानेत्र म्हणजेच ग्रामीण क्षेत्रासाठी तंत्रज्ञान आणि नावीन्यता संकुलासाठी ‘महाराष्ट्राचे नेटवर्क’ हा प्रकल्प, भाभा अणुसंशोधन केंद्राच्या मार्गदर्शन विभागाकडून स्थापन करण्यात आलेला ‘ग्रामीण मानव आणि साधनसंपत्ती विकास सुविधा प्रकल्प’ आणि शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करणारा ‘शिक्षण पंढरी’ या तीन प्रकल्पांबाबत या प्रदर्शनातून जागृती करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mkcl wari technology anil kakodkar