पिंपरी : जगताप कुटुंबातील दीर-भावजयीमधील गृहकलह मिटला आहे. आमदार अश्विनी जगताप यांनी माघार घेतली असून, त्यांच्यासह माजी नगरसेवकांनी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी देण्याची मागणी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे भाजपपुढील डोकेदुखी कमी झाली असून, शंकर जगताप यांचा चिंचवड विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीचा मार्ग मोकळा झाल्याचे खात्रीशीर सूत्रांनी सांगितले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघावर निर्मितीपासून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे वर्चस्व राहिले. २०२३ मध्ये त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पत्नी अश्विनी आणि बंधू शंकर जगताप यांच्यात उमेदवारीवरून रस्सीखेच झाली होती. दोघांनीही उमेदवारी मागितली होती; परंतु पक्षश्रेष्ठींनी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आणि त्या विजयी झाल्या. महाविकास आघाडीतील राहुल कलाटे यांनी बंडखोरी केल्याने तिरंगी लढत झाली. त्यामुळे जगताप ३६ हजार मतांनी विजयी झाल्या. सहानुभूती आणि बंडखोरी जगताप यांच्या पथ्यावर पडली; मात्र राष्ट्रवादीचे नाना काटे यांनी ९९ हजार मते घेतली होती.
हेही वाचा : पिंपरी : अजित पवारांना बालेकिल्ल्यात धक्का; विश्वासू शिलेदाराने सोडली साथ
यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी जगताप दीर-भावजयीमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू होती. दोघांनीही उमेदवारीवर दावेदारी सांगितली होती. तर, पक्षातील स्पर्धकांनी जगताप कुटुंबात उमेदवारी देण्यास तीव्र विरोध केला. जगताप कुटुंबात उमेदवारी देऊ नका, एकदाच नगरसेवक झालेल्या व्यक्तीला उमेदवारी न देता आमच्यापैकी काेणालाही उमेदवारी देण्याची मागणी पक्षातील १५ माजी नगरसेवकांच्या गटाने केली. त्यामुळे भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली.
हेही वाचा : पिंपरी- चिंचवड: आयात उमेदवाराच आम्ही काम करणार नाहीत; शिवसेना ठाकरे गटाचा सर्वानुमते ठराव, पक्ष काय भूमिका….
कुटुंबाच्या वादात आमदारकी बाहेर जाण्याची शक्यता वर्तविली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार अश्विनी जगताप यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेतल्याचे सांगण्यात येत आहे. माजी नगरसेवकांसह आमदार जगताप यांनी शंकर जगताप यांना उमेदवारी देण्याची शिफारस पक्षाकडे केली. जगताप दीर-भावजय यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची पुण्यात भेट घेतली. आमदार जगताप यांनी शंकर यांना उमेदवारी देण्याची शिफारस प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे केल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.