पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गुल्हाणे यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला. भास्कर जाधव यांनी नारायण राणे, त्यांचे चिरंजीव आमदार निलेश राणे, माजी खासदार नितेश राणे यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. सिंधुदुर्गातील कुडाळ येथे त्यांनी जाहीर सभेत राणे यांच्यावर टीका केली होती. याबाबत ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यानंतर तक्रारदाराने डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात जाधव यांच्या विरोधात फिर्याद दिली होती. त्यानंतर या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. जाधव यांचे वकील ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी शिवाजीनगर न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. त्या वेळी जाधव यांना न्यायालयाने तात्पुरता जामीन अर्ज मंजूर केला होता.
जाधव यांचा जामीन कायम करण्यात यावा, यासाठी ॲड. ठोंबरे यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर न्यायालायात सुनावणी झाली. जाधव यांनी कुडाळ येथील सभेत केलेल्या भाषणात समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केले नव्हते. जाधव यांच्या विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यातील कलम १५३ (अ) लागू होत नाही. जाधव तपासात सहकार्य करतील. न्यायालयाने घालून दिलेल्या अटी आणि शर्तींचे पालन केले जाईल. जाधव यांचा अंतरिम जामीन कायम करण्यात यावा, असा युक्तिवाद ॲड. ठोंबरे यांनी केला.
सरकार पक्षाकडून सरकारी वकील ॲड. प्रदीप गेहलोत यांनी जामिनास विरोध केला. जाधव यांनी भाषण केल्याचे कबूल केले. त्यांनी जाणूनबुजून भाषणाची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित केली होती. जाधव यांच्या आवाजाच्या नमुन्यांची तपासणी करायची आहे. त्यामुळे न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर करू नये, असा युक्तिवाद ॲड. गेहलोत यांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गुल्हाणे यांनी जाधव यांचा जामीन अर्ज मंजूर केला.