एखाद्या फडर्य़ा वक्तयाप्रमाणे भन्नाट भाषण करत पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी चौफेर टोलेबाजीने उपस्थितांची मनेजिंकली. पुणे व पिंपरीतील आमदार-खासदार चांगले आहेत, पक्ष वेगवेगळे असले तरी त्यांचे नेहमी सहकार्य असते. त्यांच्या विकासनिधीतून एकेक कोटी रुपये घेऊन पोलीस खात्याची महत्त्वाची कामे करू. शासनाने त्यांना भरपूर निधी दिला आहे, तो वेळेत खर्च करण्याची त्यांची चिंता दूर करण्यासाठी त्यांना मदत करू. आचारसंहिता लागू झाली तर उगीच त्यांचीही अडचण होईल, अशी गमतीदार टिपणी करत लोकप्रतिनिधी व पोलिसांनी समन्वय ठेवल्यास किती विधायक कामे करता येतात, याचे उदाहरण उभ्या महाराष्ट्राला दाखवून देऊ, असे ते म्हणाले.
पोलीस कल्याण निधीतील पाच लाख व आमदार अण्णा बनसोडे यांच्या विकासनिधीतील १० लाख खर्चून बांधलेल्या व्यायामशाळेचे उद्घाटन पोळ यांच्या हस्ते झाले.
अध्यक्षस्थानी आमदार अण्णा बनसोडे होते. याप्रसंगी अतिरिक्त पोलीस आयुक्त संजीवकुमार सिंघल, अपर पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेखला, पोलीस आयुक्त शहाजी उमाप, पोलीस निरीक्षक मोहन विधाते, नगरसेवक महेश लांडगे आदी व्यासपीठावर होते.
पोळ म्हणाले, शहरात तीन आमदार व दोन खासदार आहेत. पुण्यातही भरपूर आमदार-खासदार आहेत. त्यांची भूमिका सहकार्याची असते. जागांचे भाव सोन्यापेक्षा महाग आहेत. लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेऊन पोलीस खात्यातील महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावू. पिंपरीत बहुउद्देशीय इमारत उभारू. पोलीस सक्षम असतील तरच कायदा व सुव्यवस्था राखण्यात यश येईल. जनतेचा सहभाग व लोकप्रतिनिधींचे सहकार्य हवे. सामंजस्यातून चांगला प्रयोग करता येईल. आमदार-खासदारांना भेटून हा नवीन संकल्प पूर्ण करू, असे ते म्हणाले. अण्णा बनसोडे व पोलिसांचे नाते जुने व ‘खो-खो’ सारखे आहे, अशी सूचक टिपणीही त्यांनी केली. बनसोडे म्हणाले, पिंपरी ठाण्यालगतची जागा ३० वर्षांपासून रिकामी आहे. हद्दीतील पोलिसांसाठी उपयुक्त ठरणारी वास्तू तेथे उभारता येईल. त्यासाठी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याशी आम्ही तीनही आमदारांनी चर्चा केली असून त्यादृष्टीने विचार करावा, आम्ही सहकार्य करू, असे ते म्हणाले.
‘पोलीस आयुक्तांची कार्यपद्धती वसंतदादांसारखी’
पोलीस आयुक्तांचे काम वसंतदादा पाटील यांच्यासारखे आहे. एखादे काम सांगताना, ते महत्त्वाचे असून झालेच पाहिजे. कसे करायचे तुम्ही ठरवा, काय मदत पाहिजे ती करतो, असे ते म्हणतात. नेमकी वसंतदादांच्या कामाची पद्धत तशीच होती, अशी आठवण सहायक पोलीस आयुक्त शिवाजी शेलार यांनी सांगितली. तेव्हा गुलाबराव पोळ एकदम सुखावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा