बाळासाहेब जवळकर balasaheb.javalkar@expressindia.com

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी महापालिकेत सत्तांतर झाले. तरीही वर्षांनुवर्षे असलेल्या त्याच समस्यांची जंत्री जशीच्या तशी आहे. कारभारी आमदारांनी महापालिकेच्या कामांचा आढावा घेतला, तेव्हा जुन्याच समस्या नव्याने चर्चिल्या गेल्या. आयुक्तांचे नियंत्रण नाही. पुढचे पाठ आणि मागचे सपाट, अशी अधिकाऱ्यांची मानसिकता आहे. आमदारांमध्ये एकवाक्यता आणि सातत्य नाही. त्यामुळे पालथ्या घडय़ावर पाणी अशीच परिस्थिती सध्या दिसून येते.

पिंपरी-चिंचवडचे कारभारी आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी सोमवारी एकत्रितपणे बैठक घेतली. महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह सर्व प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दोन तास झालेल्या चर्चेत, शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा, अस्वच्छता, बेकायदा बांधकामे, अतिक्रमणे, मोकाट जनावरे, भटकी कुत्री, रिकाम्या पडलेल्या भाजी मंडई, भूमीजिंदगी, वैद्यकीय सुविधांचा अभाव, भोसरी रुग्णालयाचे खासगीकरण, महापालिका शाळांचा सुमार दर्जा, क्रीडा सुविधा, नदीपात्रातील राडारोडा, शौचालये, बेकायदा नळजोड, शहरातील वाहतूक समस्या, बेकायदा फलकांचा सुळसुळाट, अशा विविध विषयांवर चर्चा झाली. आमदारांनी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. चर्चेअखेर, आयुक्तांनी अधिकाऱ्यांना ठराविक मुदत दिली आणि त्यानंतरही सुधारणा न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

वास्तविक, बैठकीत चर्चा झालेल्या विषयांवर यापूर्वीही अनेकदा चर्चा झाली आहे आणि त्यावर योग्य ती कार्यवाही करू, अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी वेळोवेळी दिलेली आहे. आयुक्तांचाही कारवाईचा इशारा अनेकदा देऊन झाला आहे. मात्र, अधिकाऱ्यांकडून अपेक्षित कामगिरी होत नाही. बैठकांमध्ये हो सर म्हणत माना डोलावणारे अधिकारी बैठक संपताच मूळपदावर येत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. त्यामुळे अशा आढावा बैठकांमधील चर्चा ही ‘नळी फुंकली सोनारे, इकडूनी तिकडे गेले वारे’, या प्रकारातील ठरते. काही अपवाद वगळता बरेचसे अधिकारी मुजोर आहेत. ते कोणालाही जुमानत नाहीत. महापालिकेत सत्ता भाजपची असली तरी अनेक अधिकारी राष्ट्रवादीधार्जिणे आहेत. ते शक्य तिथे खोडा घालण्याचे काम करतात. सत्ताधारी आमदारांचे जवळचे अधिकारी सर्वाधिक कामचुकार आहेत आणि त्यांना अभय मिळते. त्यामुळे इतर अधिकारी अस्वस्थ होतात. कारभारी आमदारांमध्ये एकमत नसल्याचा फटका अधिकाऱ्यांना बसतो. अनेक कामांमध्ये त्यांचा हस्तक्षेप त्रासदायक असतो. मात्र, अधिकाऱ्यांना तोंड दाबून बुक्क्य़ांचा मार सहन करावा लागतो. बहुतांश नगरसेवकांची कामे स्वहिताची असतात. एकीकडे नगरसेवक तक्रारी करतात आणि अधिकारी कारवाईसाठी गेल्यास त्यांच्यावर दबाव आणला जातो. त्यातून लोकप्रतिनिधींचा दुटप्पीपणा दिसून येतो.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla laxman jagtap and mahesh lunde meeting to review pcmc work