पिंपरी : ‘गेल्या आठ दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील समाविष्ट भागांत पिवळसर आणि दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याचा विषय गांभीर्याने घ्यावा. कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष खपवून घेतले जाणार नाही. शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात,’ अशा सूचना भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या.
उन्हाची तीव्रता वाढल्याने विस्कळीत, अपुऱ्या, कमी दाबाने पाणीपुरवठ्यासह शहरातील काही भागांत दूषित पाणीपुरवठा होत आहे. याबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. मात्र, प्रशासनाकडून स्वच्छ पाणीपुरवठा होत असल्याचा दावा केला जात होता. या पार्श्वभूमीवर आमदार लांडगे यांनी जलसंपदा विभाग व महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आंद्रा धरणातील पाणी उचलण्यात येत असलेल्या इंद्रायणी नदीवरील निघोजे येथील जलउपसा केंद्र आणि निगडीतील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता विजयकुमार भोसले या वेळी उपस्थित होते.
आमदार लांडगे म्हणाले, ‘आंद्रा धरणातून ८० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी पिंपरी-चिंचवड महापालिका उचलते. जलसंपदा विभागातर्फे शुद्ध पाणी दिले जाते. गेल्या काही दिवसांपासून जलसंपदा विभागाचे देहू ते निघोजेदरम्यान तांत्रिक काम सुरू आहे. त्यामुळे धरणामधून शुद्ध पाणी पुरवठ्याचे प्रमाण कमी झाले आहे. पिंपरी-चिंचवड हद्दीबाहेरील म्हाळुंगे, देहू, तळेगाव या भागातील रहिवासी क्षेत्रातील सांडपाणी आणि औद्योगिक पट्ट्यातील रसायनमिश्रित पाणी नदीपात्रात मिसळत होते. त्यामुळे महापालिकेला पाणी प्रदूषणाची समस्या भेडसावत आहे. जलशुद्धीकरण केंद्रामध्ये प्रदूषित पाणी येते. त्यावर प्रक्रिया करताना प्रशासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा.’
दरम्यान, जलसंपदा विभागाची कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत. तसेच, महापालिकेला शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या सूचनाही आमदार लांडगे यांनी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांच्याशी संपर्क साधून दिल्या.
शहराचा पाणीपुरवठा स्वच्छ असावा. त्यासाठी महापालिका प्रशासन, जलसंपदा विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ अशा आस्थापनांनी एकत्रित प्रयत्न करणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. प्रस्तावित कामे मार्गी लावण्यासाठी कृती आराखडा तयार करावा. – महेश लांडगे, आमदार