शिरूर लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाचा उमेदवार कोण असणार याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे. कारण त्या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विद्यमान खासदार अमोल कोल्हे हे पुन्हा निवडणूक लढवणार असण्याची शक्यता आहे. शिरूर लोकसभा मतदार संघात भाजपाचा उमेदवार हा महेश लांडगे असावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. महेश लांडगे हे अत्यंत कष्टाळू आणि उत्कृष्ट नेते आहेत. असं कौतुक प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल आहे. परंतु, महेश लांडगे हे शिरूर लोकसभा लढवणार की नाही. यावर बोलताना आमचं केंद्रीय नेतृत्व आणि राज्यातील महायुतीचे प्रमुख नेते उमेदवार ठरवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आमदार महेश लांडगे यांना शिरूर लोकसभेसाठी सध्यातरी वेट अँड वॉच ची भूमिका घ्यावी लागणार आहे.
हेही वाचा >>> गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात कायदेशीर नोटीस; सात दिवसांत माफी न मागितल्यास फौजदारी दावा दाखल करण्याचा इशारा
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शिरूर लोकसभेचा खासदार सर्वात जास्त मतांनी निवडून येईल तसा प्रतिसाद शिरूर लोकसभा मतदारसंघात मिळत आहे. महा विजयाचा ४५ चा आकडा आम्ही पूर्ण करू असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी अमोल कोल्हे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना बावनकुळे म्हणाले, आमच्यावर टीका करणाऱ्यांनी जनतेला खऱ्या अर्थाने फसवला आहे. माझ्यावर अमोल कोल्हे यांनी टीका केली आहे, त्यांना ती टीका लखलाभ. पुढे ते म्हणाले, मराठा बांधवांनी मला काळे झेंडे दाखवले. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला संपूर्ण आरक्षण दिल गेलं. मराठा आरक्षणाचे खरे शिल्पकार हे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील आहेत. जे आरक्षण कॅबिनेटने दिले, जे आरक्षण विधिमंडळात मंजूर झालं, सुप्रीम कोर्टात देखील टिकलं ते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे. ज्यांनी हे आरक्षण घालवलं त्यांनाच प्रश्न विचारले पाहिजेत. मला जे काळे झेंडे दाखवून काय फायदा?, मराठा समाजाच्या आरक्षणाला भाजपाच संपूर्ण समर्थन आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. त्यामुळे काळे झेंडे दाखवून मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. असेही त्यांनी म्हटलं आहे.