पिंपरीत ३५ नगरसेवकांचा नव्याने ‘गृहप्रवेश’; भाजपला ‘अच्छे दिन’, राष्ट्रवादीला खिंडार; शिवसेना, काँग्रेस व मनसेलाही गळती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पिंपरी महापालिकेच्या आगामी निवडणुकांना जेमतेम सहा महिने राहिले असतानाच शहरात ‘आयाराम-गयाराम’चा जोरदार हंगाम सुरू झाला आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी भाजपची वाट धरल्यानंतर त्यांचे नऊ समर्थक नगरसेवकही त्याच मार्गावर आहेत. शिवसेनेच्या दोन नगरसेविका व अन्य चार नगरसेवकांचे जवळचे नातेवाईक यापूर्वीच भाजपच्या गोटात दाखल झाले आहेत. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक नगरसेवकांची मोठी फळी भाजपमध्ये जाण्याच्या पूर्ण तयारीत आहे. येत्या काही दिवसात सर्व मिळून ३५ ते ४० नगरसेवक आपला मूळ पक्ष सोडून नव्याने ‘गृहप्रवेश’ करणार आहेत.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार ‘कारभारी’ असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात आपला मूळ पक्ष सोडून भाजपच्या वाटेवर असलेल्या नगरसेवकांमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या मोक्याच्या क्षणी राष्ट्रवादीला खिंडार पडल्याचे चित्र निर्माण होणार आहे. भाजपचे पिंपरीत आतापर्यंत नाममात्र अस्तित्व होते. पालिकेत अवघे तीन असे दयनीय संख्याबळ होते. मात्र, केंद्रात व राज्यात सत्ता प्राप्त झाल्यानंतर महापालिकाजिंकण्याची महत्त्वाकांक्षा ठेवलेल्या भाजपच्या दृष्टीने नगरसेवकांची होणारी मोठी आयात म्हणजे पक्षाला राजकीय पातळीवर तरी ‘अच्छे दिन’ आल्याची पावतीच मानली जाणार आहे. यानिमित्ताने शिवसेना, काँग्रेस तसेच मनसेलाही गळती लागल्याचे चित्र पुढे आले आहे.

दोन वर्षांपासून तळ्यात-मळ्यात आणि निर्णय गुलदस्त्यात असा खेळ केल्यानंतर आमदार महेश लांडगे यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले. भोसरी मतदारसंघातील सर्वपक्षीय समर्थक नगरसेवकांसमवेत लांडगे यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यातच त्यांनी आपले राजकीय इरादे स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे नगरसेवक शांताराम भालेकर, नितीन काळजे, सुरेश म्हेत्रे, अरूणा भालेकर, मनसेचे राहुल जाधव, मंगेश खांडेकर, काँग्रेसचे जालींदर शिंदे, शिवसेनेचे अजय सायकर, नगरसेविका शुभांगी लोंढे यांचे पती संतोष लोंढे अशी त्यांच्या समर्थकांची मोठी यादी आहे. महेश लांडगे जिथे जातील, तिथेच जाण्याचा या नगरसेवकांचा ठाम निर्धार आहे. सर्वपक्षीय प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तोच कित्ता गिरवला आहे. आमदार लांडगे यांचा मुंबईत २३ सप्टेंबरला पक्षप्रवेश होणार असल्याचे भाजप वर्तुळातून सांगण्यात येते. त्याचवेळी लांडगे समर्थक नगरसेवक आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. शिवसेनेच्या सीमा सावळे आणि आशा शेंडगे या दोन नगरसेविकांनी यापूर्वीच शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केले असून दोघीही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेसच्या नगरसेविका आरती चोंधे यांचे पती सुरेश चोंधे, राष्ट्रवादीच्या नगरसेविका माया बारणे यांचे पती संतोष बारणे, राष्ट्रवादीचेच नगरसेवक विनायक गायकवाड यांच्या पत्नी ममता आणि नगरसेवक शेखर ओव्हाळ यांचे बंधू गणेश यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. योग्य वेळी संबंधित नगरसेवकही उघडपणे भाजपमध्ये जाण्याचे स्पष्ट संकेत आहेत. शिक्षण मंडळाचे सभापती चेतन घुले यांनी पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

याशिवाय, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक नगरसेवकांची मोठी पलटण भाजपमध्ये जाणार आहे. त्यामध्ये राजेंद्र जगताप, नवनाथ जगताप, शत्रुघ्न काटे आदी नगरसेवकांचा समावेश आहे. मात्र, ते राजकीयदृष्टय़ा योग्य ‘टायमिंग’च्या प्रतीक्षेत आहेत. याचपध्दतीने, काँग्रेसचे काही नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात ते आहेत. पिंपरी पालिकेच्या राजकारणात सर्वच पक्षांना गळती लागली असून येत्या काही दिवसात ‘आयाराम-गयाराम’चा खेळ आणखी रंगणार आहे.

कोण कुणाच्या वाटेवर?

* भाजपच्या वाटेवर असलेले आमदार महेश लांडगे यांचे समर्थक असलेले राष्ट्रवादीचे ४, शिवसेनेचे दोन, मनसेचे दोन आणि काँग्रेसचे एक नगरसेवक भाजपमध्ये जाण्याची शक्यता.

* शिवसेनेच्या दोन नगरसेविकांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या चार नगरसेविकाही भाजपच्या वाटेवर.

* काँग्रेसचे काही नगरसेवक राष्ट्रवादीत दाखल होण्याच्या तयारीत.