पुणे : “१० वर्षांत काय केलं?, असा प्रश्न विचारणाऱ्यांना मी सांगणार आहे. शास्तीकर सरसकट माफ झाला आणि तुम्ही व तुमचे कुटुंबीय त्याचे लाभार्थी आहेत. आतापर्यंत मी कुणाचे नाव घेतले नाही. मात्र, आता भर चौकात नाव घेवून सांगणार कुणाचा किती शास्तीकर माफ झाला. ‘भोसरीत राहण्याची लाज वाटते’ असा आरोप तुम्ही केला. त्यामुळे आम्हा भोसरीकरांचा स्वाभिमान दुखावला आहे. मी माफ केले असते. पण, माझ्या भोसरी गावचे नाव बदनाम करायला नको होते”, असे टिकास्त्र आमदार महेश लांडगे यांनी सोडले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भोसरी गावठाण येथील महेश लांडगे स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या मैदानावर निवडणूक नियोजनाबाबत भोसरीतील ग्रामस्थ व सहकाऱ्यांची बुधवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीचे सभेत रुपांतर झाले.

आणखी वाचा-शिक्षण विभागातील दहा अधिकाऱ्यांना पदोन्नती… कोणाला कोणते पद मिळाले?

आमदार महेश लांडगे म्हणाले की, आपण राजकारणात आहोत. तुम्ही मला बदनाम करा. मात्र, एवढी पातळी सोडू नका. ज्या गावात आपण राहतो. त्या गावाला बदनाम करु नका. आपण ज्या संस्कारात, विचारांत वाढतो. त्याचा अनादर करु नका. कुठेही बोलताना भोसरीबद्दल आपल्याला आदरच पाहिजे. भोसरी माझा स्वाभिमान आहे. माझ्या स्वाभिमानाला कोणी धक्का लावेल, तर त्याला जश्यास तसे उत्तर देणार आहे.

निवडणूक जिंकायची म्हणून घाणेरडे राजकारण सुरू आहे. भोसरीच्या मातीत समोरच्याला उचलून टाकणारे पैलवान तयार होतात. समोरच्याला चावणारे नाही. मलाही लाज वाटते, तुमच्यासारखी माणसे भोसरीत जन्माला आली. अस ही आमदार महेश लांडगे म्हणाले आहेत.