विधान परिषदेच्या आश्वासन समितीवर आमदार मोहन जोशी यांची फेरनिवड करण्यात आली असून समितीच्या प्रमुखपदावर ते सन २०१३-१४ या वर्षांसाठी काम करणार आहेत. जोशी यांची या समितीवर सलग तिसऱ्यांदा निवड झाली आहे.
विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी महाराष्ट्र विधान मंडळाच्या विविध समित्यांची पुनर्रचना नुकतीच केली. या पुनर्रचनेत आमदार जोशी यांची आश्वासन समितीच्या प्रमुखपदी फेरनिवड करण्यात आली असून ते सन १३-१४ या वर्षांत या पदावर काम करतील. समितीमध्ये भाई जगताप, डॉ. सुधीर तांबे, प्रकाश भिन्साळे, अॅड. निरंजन डावखरे, अरुणकाका जगताप, अॅड. आशिष शेलार, प्रवीण पोटे, डॉ. दीपक सावंत आणि किरण पावसकर हे सदस्य आहेत.
विधान परिषदेच्या अधिवेशनात विविध चर्चाच्या दरम्यान मंत्र्यांकडून जी आश्वासने दिली जातात त्याची पूर्तता झाली आहे का नाही, हे पाहण्याची जबाबदारी आश्वासन समितीकडे असते. आश्वासनानंतर नव्वद दिवसांच्या आत आश्वासनाची पूर्तता करणे बंधनकारक आहे. ते शक्य न झाल्यास तशी माहिती आश्वासन समितीला द्यावी लागते.
 आश्वासन समितीचे अहवाल सीडीच्या स्वरूपात सभागृहाला सादर करण्याचा प्रयोग आमदार जोशी यांनी सुरू केला असून विधिमंडळाच्या इतिहासात प्रथमच सीडीच्या स्वरुपातील अहवाल सादर झाला आहे. जोशी यांनी समितीचे असे सोळा अहवाल सादर करून विक्रम केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla mohan joshi re elected on assurance committee