राष्ट्रवादीचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील व भोसरीचे आमदार विलास लांडे यांच्यात सुरू असलेला संघर्ष चिखलीतील कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत ‘आत्मक्लेशा’ साठी गेलेल्या लांडे यांच्या बालेकिल्ल्यात येऊन मोहिते यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. शेपूट कापलेल्या वाघासारखे वागू नका, असे खोचक विधान करत विरोधक का वाढले, स्वपक्षीयांची निमंत्रणे का बंद झाली, याचे आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला त्यांनी लांडे यांना दिला.
पाच दिवस चाललेल्या चिखलीतील कबड्डी स्पर्धा सुरुवातीपासून वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिली. आमदार लांडे यांच्याकडून दुखावलेली मंडळी या स्पर्धेच्या निमित्ताने एकवटली होती. विलास लांडे व महापौर मोहिनी लांडे यांना कसलेच निमंत्रण नव्हते. उद्घाटनासाठी लांडे विरोधक व शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव तसेच आमदार दिलीप मोहितेंना निमंत्रित करण्यात आल्याने सर्वाच्याच भुवया उंचावल्या होत्या. अजितदादांच्या प्रभावक्षेत्रात खासदार उदयनराजे भोसले यांना बोलावण्यामागे व बोलावूनही ते न येण्यामागे काय कारण होते, हा देखील चर्चेचा विषय ठरला. स्पर्धा ऐन रंगात आली असताना हुकमी डाव टाकून मोठा पेच निर्माण करण्याचा प्रयत्न पडद्यामागून झाला. बक्षीस समारंभासाठी अजित पवार येणार होते. मात्र, क ऱ्हाडला त्यांचा ‘आत्मक्लेश’ सुरू होता, त्यामुळे ते आले नाहीत. अशात, रविवारी रात्री स्पर्धेचा समारोप झाला, तोही लक्षात राहण्यासारखाच.
मोहिते पाटील यांनी विलास लांडेंना शेपटी कापलेल्या वाघाची उपमा दिली. तो वाघ झेप घेऊ शकत नाही व शिकारही करू शकत नाही. त्याला िपजऱ्यात घालण्याचे काम करावे लागेल. लपून वार करण्यापेक्षा समोर येऊन दोन हात करावे. आपल्याला सन्मानपूर्वक बोलावले जाते. तुम्ही स्थानिक आमदार असून का निमंत्रित होत नाही, याचे आत्मपरीक्षण करा. एकीकडे खेळाडूंना मदत करा, असे राज्य शासनाकडून सांगितले जाते. दुसरीकडे, शासनाचेच प्रतिनिधी खेळाडूंना त्रास होईल, असे जाणीवपूर्वक वागतात. चिखली स्पर्धेसाठी खेळाडूंना दिलेली तात्पुरती जागा दबावामुळे खाली करण्यास सांगितले जाते, खेळाडूंची ठरवून गैरसोय कली जाते. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे. यामागे कोण होते, हे चिखलीकर जाणून आहेत, योग्य वेळी ते उत्तरही देतील, अशी सूचक विधाने मोहितेंनी केली. या वेळी आमदार मदन पाटील, राष्ट्रवादीचे िपपरी शहराध्यक्ष योगेश बहल, माजी महापौर संजोग वाघेरे, युवक अध्यक्ष मयूर कलाटे, संयोजक नगरसेवक दत्ता साने, महेश लांडगे, संजय नेवाळे आदींसह मोठय़ा संख्येने क्रीडारसिक उपस्थित होते.
विलास लांडे म्हणजे शेपटी कापलेला वाघ – आमदार दिलीप मोहिते
राष्ट्रवादीचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील व भोसरीचे आमदार विलास लांडे यांच्यात सुरू असलेला संघर्ष चिखलीतील कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला.
आणखी वाचा
First published on: 16-04-2013 at 02:14 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla mohite criticises vilas lande roughly