पुणे प्रतिनिधी: भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट यांच्या विकास निधीमधून कसबा गणपती मंदिर परिसरात साकारण्यात आलेल्या पाच भित्तिचित्राचे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कसबा भाग संघचालक अँड प्रशांत यादव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी खासदार गिरीश बापट यांचे चिरंजीव गौरव बापट, आमदार रविंद्र धंगेकर, भाजपचे नेते हेमंत रासने यांच्यासह नागरिक उपस्थित होते. तसेच कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा काँग्रेस पक्षाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी पराभव केला होता.
निवडणुकीनंतर आज गुढीपाडवा सणाच्या निमित्ताने दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आल्याने त्या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. पण दोघांनी पुणे शहराची राजकीय संस्कृती जपत दोघांमध्ये चांगल्या गप्पा झाल्या. त्या दोघांच्या कृतीचं नागरिकांनी कौतुक केलं असून असंच चित्र आगामी काळात देखील पाहण्यास मिळव हीच अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की, मी दादापुढे (हेमंत रासने कडे हात करित म्हणाले) जास्त बोलत नाही. मागील तीन दशक खासदार गिरीश बापट यांनी शहरात काम केले असून राजकीय स्तर कसा ठेवावा. हे आजच्या गुढीपाडवा सणाच्या निमित्ताने एकत्रित आणण्याच काम त्यांनी केले आहे. त्यामुळे मी खासदार गिरीश बापट यांचे धन्यवाद मानतो. तसेच समाजातील प्रत्येक घटकाला सोबत ठेवून आणि त्याचा समतोल कसा राखला जाईल अस काम त्यांनी केलं आहे. त्याचबरोबर मी गिरीश बापट यांच्या विरोधात दोन वेळेस विधानसभा निवडणुक लढवली आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून काम करण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढे देखील त्याच पद्धतीने काम करीत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच ते पुढे म्हणाले की, मी आणि दादांनी (हेमंत रासने यांच्याकडे पाहत रवींद्र धंगेकर म्हणाले) १५ वर्ष एकत्रित पुणे महापालिकेमध्ये काम केले आहे. तसेच हेमंत रासने यांना पुणे महापालिकेमध्ये चार वेळा स्थायी समिती अध्यक्षपदाचा अनुभव असल्याने आगामी काळात मतदार संघातील काम करतेवेळी निश्चित मला फायदा होणार आहे. मात्र लोकशाहीमध्ये जनता ठरवित असते. विजय आणि पराजय असतो आणि आपल्या खांद्यावर जी पताका असते. ती पुढे पुढे घेऊन जायची असते आणि मी काही अमरपट्टा घेऊन आलो नाही. पण समाजाची सेवा करीत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच ते पुढे म्हणाले की, मला दादामुळे (हेमंत रासने यांच्याकडे पाहत रवींद्र धंगेकर म्हणाले) देशभरात नागरिक ओळखायला लागले.असे म्हणताच उपस्थितमध्ये एकच हशा पिकला. तसेच आम्ही दोघे मित्र असून निवडणुकीच्या काळात भेटू शकलो नाही.आता आम्ही दोघे मतदार संघाच्या विकास कामासाठी एकत्रित काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणुकीतील प्रतिस्पर्धी एकत्रित आला आहात त्यावर हेमंत रासने म्हणाले की,आम्ही प्रतिस्पर्धी नसतो.आम्ही दोन वेगवेगळ्या मत प्रवाहाचे उमेदवार असतो.तसेच आम्ही केलेल्या कामांचा आशिर्वाद लोकांकडे मागत असतो.त्यामध्ये जनता दोघांना देखील आशिर्वाद देत असते.मात्र जनता ज्या उमेदवाराला अधिक आशिर्वाद देते तो निवडून येतो आणि दुसरा त्याच्या पद्धतीने काम करीत असतो.तसेच आम्ही दोघे यापुढील काळात देखील शहराच्या विकास कामांसाठी एकत्रित येऊ असे त्यांनी सांगितले.