पुण्यातील बिल्डर विशाल अगरवाल यांच्या अल्पवयीन मुलाने अलिशान पोर्श कार बेदरकारपणे चालवून दोन संगणक अभियंताना चिरडले. या प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटत असतानाच पुण्यातील काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी सरकार आणि पुणे पोलिसांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणात कमालीचा हलगर्जीपणा दाखवला असून बिल्डर कुटुंबाच्या पैशाच्या पाकिटाखाली पोलीस दबलेले आहेत, असा आरोप त्यांनी केला. आज पोलीस आयुक्तालयाबाहेर आंदोलन करताना त्यांनी आपल्या दोन प्रमुख मागण्या मांडल्या आहेत.
काय म्हणाले रवींद्र धंगेकर?
आंदोलन करत असताना रवींद्र धंगेकर म्हणाले, “विधानसभेत निवडून गेल्यानंतर मी सातत्याने अमली पदार्थाविरोधात भूमिका घेत आलो आहे. अमली पदार्थ पुणे शहरातून हद्दपार करण्यात यावेत, ही मागणी मी अनेकदा केली. त्याचवेळी ससूनचे प्रकरण घडले. त्या प्रकारणात आज-उद्या असे करत करत डॉ. संजीव ठाकूर यांना अजूनही अटक केलेली नाही. हे सरकार गुन्हेगारांच्या पाठिशी आहे, हे चित्र आपल्याला दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यात दोन संगणक अभियंत्यांची अपघात नाही तर हत्या झाली. ही हत्या झाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी ज्या प्रकारे तपास केला, त्यात त्यांनी अनेक त्रुटी ठेवल्या. दोन दोन एफआयआर फाडण्यात आले. पुणेकर रस्त्यावर आल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्यात यावे लागले. पुणेकरांची समजूत काढण्यासाठी त्यांनी दुसरा एफआयआर दाखल केला.”
रवींद्र धंगेकरांनी यावेळी मागणी केली की, तपास अधिकाऱ्यावर पहिला गुन्हा दाखल केला पाहीजे. जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत मी पुण्यात ठिकठिकाणी जाऊन रोज आंदोलन करणार आहे. अपघाताच्या एका रात्रीत कोट्यवधींची उलाढाल झाली, असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला. कोठडीत असताना अल्पवयीन आरोपीने पिझ्झा पार्टी केली. रेड कार्पेट टाकून त्याला अवघ्या काही तासात सोडण्यात आले. आरोपीचे पालक पोलीस ठाण्यात मालकासारखे वागत होते, त्याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे.
रवींद्र धंगेकर पुढे म्हणाले, कल्याणीनगर येथील अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुण आणि तरुणीचे शव ससूनच्या शवागारात होते, त्यांचा पंचनामाही झाला नव्हता, तेवढ्यात आरोपी घरी पोहोचला होता. पुणे शहराला लागलेला हा कलंक आहे. पुणे विद्येचं माहेरघर आहे, लाखो विद्यार्थी पुण्यात शिकण्यासाठी येतात. या प्रकरणामुळे पालकांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यामध्ये गेलेला आपला पाल्य सुरक्षित राहिल का? अशी भीती त्यांना वाटते. पोलिसांच्या पाकिट संस्कृतीमुळे पालकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
अवैध पबच्या पोलिसांना पैसे पुरवितात
पुण्यातील पब अवैध आहेत. मात्र उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी तिथे धाड टाकत नाहीत. मनपा त्यांची तपासणी करत नाही. मग पोलीस अधिकारी, पोलीस आयुक्त या पबची तपासणी करतात की नाही? जर ते तपासणी करत नसतील तर त्यांच्यापर्यंत प्रचंड पैसा पोहोचत असणार, असा आरोप धंगेकर यांनी केला.
बिल्डर कुटुंबाने पैशाच्या जोरावर गुन्हा पचवला
यावेळी रवींद्र धंगेकर यांनी दोन मागण्या पोलिसांसमोर ठेवल्या. हे प्रकरण जलदगतीने चालवावे आणि तपास करत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांची चौकशी करावी, अशा दोन मागण्या धंगेकर यांनी केली. धंगेकर पुढे म्हणाले की, अगरवाल कुटुंबियांनी पैशांच्या जोरावर याआधीही अनेक गुन्हे पचवले आहेत. हाही गुन्हा पचवला होता. पण पुणेकर रस्त्यावर उतरल्यामुळे हे प्रकरण उजेडात आले. पुणे पोलिसांवर पैशांच्या पाकिटाचे वजन आहे.