पुणे : सध्या राज्यभरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) वाहन चालविण्याचा परवाना आणि वाहन नोंदणीच्या स्मार्टकार्डची टंचाई आहे. यासाठी परिवहन विभागाने आधीच्या कंपनीचा करार रद्द करून दुसऱ्या कंपनीसोबत करार केला आहे. याचबरोबर मुंबई, नागपूर, औरंगाबादला स्मार्टकार्डची छपाई करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यावर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी जोरदार आक्षेप घेतला.
आमदार धंगेकर आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाला भेट दिली. त्यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ.अजित शिंदे यांची भेट घेतली. या प्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर आणि इतर वरिष्ठ अधिकारी हजर होते. आरटीओच्या सेवा मिळवण्यात नागरिकांना येणाऱ्या अडचणींचा धंगेकर यांनी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. याचबरोबर पुण्याला सापत्नभावाची वागणूक दिली जाऊ नये, अशी आग्रही भूमिकाही मांडली.
वाहन चालविण्याचा परवाना आणि वाहन नोंदणीच्या स्मार्टकार्डची छपाई मुंबई, औरंगाबाद आणि नागपूरला करण्याच्या हालचाली सुरू आहेत. यातून पुण्याला वगळण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर धंगेकर यांनी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. अधिकाऱ्यांनी याबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले. यावर धंगेकर यांनी परिवहन आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली जाईल, असे सांगितले.
हेही वाचा >>>मी खडकवासला मतदार संघामधून अगोदरच पक्षाकडे उमेदवारी मागितली: रुपाली चाकणकर
पुण्यापेक्षा बारामतीत चित्र चांगले
आमदार धंगेकर यांनी बारामतीतील सरकारी कार्यालये पुण्यापेक्षा अनेक पटीनी चांगली असल्याचा दाखला दिला. पुण्यातील सरकारी कार्यालयांचे रुप बदलायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आरटीओच्या इमारतीचेही नूतनीकरण केले जावे, अशी मागणी त्यांनी केली. याबाबत सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.